माण तालुक्‍यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली

सातारा जिल्ह्यातील 78 गावे 419 वाड्यामध्ये 79 टॅंकर सुरू

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 3 – विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा चांगल्याच वाढल्या आहेत.सातारा जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात असलेल्या माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या चार तालुक्‍यांमध्ये पाणी टंचाई वाढली आहे. जिल्ह्यातील 78 गावे 419 वाड्यामध्ये 79 टॅंकर सुरू आहेत.
पुणे विभागात माण तालुक्‍यात पाणीटंचाई सर्वांत गडद झाली असून, तेथे 52 गावे, 398 वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी 57 टॅंकर सुरू आहेत. माण तालुक्‍यातील 94 हजारांहून अधिक लोकसंख्या आणि 25 हजारांहून अधिक जनावरांची तहान भागविण्यासाठी टॅंकरची मदत घ्यावी लागत आहे. खटाव आणि फलटण तालुक्‍यांतही जनावरांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. या चार जिल्ह्यांच्या 28 तालुक्‍यांमधील 280 गावे 2 हजार 59 वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल 305 टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. टंचाईग्रस्त भागातील सुमारे 6 लाख 57 हजार 763 लोकसंख्या आणि 34 हजार 143 हजार जनावरांची तहान भागविण्यासाठी टॅंकरची धावाधाव सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी 208 विहिरी आणि विंधन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.
पुणे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पाणीटंचाईने सातत्याने वाढत आहे. आता पाण्याबरोबरच चाराटंचाईही भासू लागण्याने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहेत. जिल्ह्यात पुरंदर तालुक्‍यात खासगी चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांमधील 40 गावे 489 वाड्यांमध्ये टंचाई असून, 1 लाख 42 हजार 388 लोकसंख्येला 74 टॅंकरच्या साह्याने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील शिरूर, बारामती, दौंड, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, इंदापूर, खेड, हवेली तालुक्‍यात पाणीटंचाई वाढली आहे.
पुणे, सातारा जिल्ह्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यात टंचाईच्या झळा वाढल्या आहेत. सांगलीच्या पाच तालुक्‍यांतील 91 गावे 628 वाड्यांमधील सुमारे 2 लाख 5 हजारांहून अधिक लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी 88 टॅंकर धावत आहेत. जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्‍यांत पाणीटंचाई चांगलीच वाढली असून, जतमधील 46 गावे आणि आटपाडीमधील 23 गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणी केला जात आहे. कवठेमहांकाळ, तासगांव, खानापूर तालुक्‍यातही पाणीपुरवठ्यासाठी टॅंकर सुरू करावे लागले आहेत.
उन्हाचा चटका वाढताच सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यात पाणीटंचाई डोकेवर काढले आहे. जिल्ह्यातील 10 तालुक्‍यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष वाढले असल्याने 71 गावे, 523 वाड्यांमधील 1 लाख 65 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, माढा, करमाळा, माळशिरस, मोहोळ, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, बार्शी या तालुक्‍यांमध्ये कमी अधिक प्रमाणात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×