माण-खटावमधील जलसंधारण कामांचा राज्यासमोर आदर्श

खा. शरद पवार


मांडवे येथील श्रमदानस्थळी भेट

वडूज : महाराष्ट्राचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांचे विचार मानणारे आपण लोक असून एकमेकांना साथ करण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले. दरम्यान, माण-खटावमध्ये लोकांनी श्रमदानातून केलेल्या जलसंधारण कामातून महाराष्ट्रासमोर आदर्श उभा राहिला आहे. हे काम असेच सुरू ठेवा, यासाठी लागेल ती मदत करू, अशी ग्वाही खा. पवार यांनी दिली.

मांडवे, ता. खटाव येथे श्रमदानातून सुरू असलेल्या जलसंधारण कामाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. यावेळी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा बॅंकेचे संचालक अर्जुन खाडे, खटाव पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे, हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, माण पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, सरपंच भाग्यश्री पाटील, उपसरपंच रत्नमाला चंदनशिवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कायम दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थ एकवटलेले असून राजकीय पक्ष, गट-तट, स्थानिक हेवे-दावे विसरून व उन्हातान्हाचा विचार न करता श्रमदान करत आहेत. दोन पैसे उभे करून आर्थिक हातभारही लावत आहेत. या कामात माता-भगिनी तरुण मुले-मुली व वयोवृद्ध सहभागी झाले आहेत. मुंबई व पुणे इतर शहरात काम करणारे लोकही शनिवारी-रविवारी येऊन श्रमदान करण्याबरोबरच आर्थिक साह्य करत आहेत. हे काम असेच सुरू ठेवा, जी मदत लागेल त्याची मदत करता येईल.

यानिमित्ताने आपण सरकारला मदत मागणार नाही. आपल्याच काही संस्था आहेत, त्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे चेअरमन यांना बोलून खटाव-माणमधील श्रमदान करणाऱ्यांना हातभार लावा, असे सांगितले आहे. त्यांनी जेसीबी, पोकलॅंडसाठी 1 कोटी रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. तसेच जिल्हा परिषदेकडून दीड कोटी रुपयांची तर मुंबई, पुणे येथील संस्थांकडून दोन कोटींची बोलणी केली.

तासा-दोन तासात पाच ते सहा कोटी रुपयांची जुळवणी करून पाणी फाऊंडेशनमध्ये भाग घेतलेल्या माण-खटाव मधील गावांना देणार असून ज्यांनी कामे सुरू केली आहेत त्यांनी आता थांबायचे नाही. ते पूर्णत्वास न्यायाचे. त्यानंतर पाऊस चांगला झाल्यानंतर हा परिसर दुष्काळी होता, हे इतिहासजमा होईल. आम्ही दुष्काळ घालवणारे व इतिहास घडवणारे आहोत.
दुष्काळाचे दुखणे घालवण्यासाठी गावानेच पुढाकार घेतला पाहिजे.

उन्हातान्हाचा विचार न करता याठिकाणी घाम गाळून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी गावकऱ्यांचे केलेल्या कामातून महाराष्ट्रासमोर वेगळा आदर्श निमार्ण केला आहे. स्वागत भाग्यश्री पाटील यांनी केले. सूत्रसंचालन पांडुरंग खाडे यांनी तर आभार सभापती संदीप मांडवे यांनी मानले.

पाणी फाऊंडेशनला एक लाखांची देणगी

भाग्यश्री अर्जुन पाटील यांनी पाणी फाउंडेशनच्या कामासाठी 1 लाख रुपयांची देणगी दिली. तसेच मुंबई येथील नोकरदार मंडळींनी सव्वा लाख रुपयांचा धनादेश दिला तर पोलीस पाटील दाजी पाटील यांनी संपूर्ण गावातील माती परीक्षण विना मोबदला करून देण्याचे जाहीर केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)