माणुसकी शून्य रुग्णालये

पिंपरी-चिंचवड वर्तमान
शर्मिला पवार

शहरात नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे रुग्णालयाकडून रुग्णांना मिळणाऱ्या वागणुकीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. केवळ पैशासाठी रुग्णाला डांबून ठेवणे, दारिद्रय रेषेखालील उपचार सवलतीचा लाभ न देणे, प्रशासनाचा मनमानी कारभार, त्यावरुन झालेले राजकारण यामध्ये रुग्णाचा हकनाक बळी गेला. रुग्णांना उपचार आजार पाहून केले जातात की त्याचा पैसा असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. रुग्णसेवा ऐवजी तारांकीत भपकेबाजपणाला बडी रुग्णालये महत्त्व देत आहेत. सर्वसामान्य रुग्णांना चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्याचा अधिकार नाही का, असा सवाल उपस्थित होत आहे.

चिंचवडमधील बिर्ला या नामांकीत रुग्णालयात दारिद्य्र रेषेखालील लाभ नाकारुन रुग्णाला बील भरण्याची सक्ती करण्यात आली. बील न भरल्याने या रुग्णाला डांबून ठेवण्यात आले. अखेर आंदोलन, पोलीस तक्रार झाल्यानंतर रुग्णाला येथून हलवण्यात आले. या सर्व घडामोडींमध्ये या रुग्णाला हकनाक जीव गमवावा लागला. बिर्ला रुग्णालयाविरोधात यापूर्वीही अनेकदा तक्रारी झाल्या आहेत. पत्रकारांना धक्काबुक्कीचे प्रकारही रुग्णालयात घडले आहेत. रुग्णालय व्यवस्थापन कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीमध्ये नाही. हुकूमशाही पध्दतीने आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांकडून “ओपीडी’च्या नावाखाली पैसे घेतले जातात. पैसे न भरल्यास उपचारासाठी दाखल करुन घेतले जात नाही. एकट्या बिर्लाच नव्हे तर शहरातील बहुसंख्य खासगी रुग्णालयांनी पवित्र अशा वैद्यकीय व्यवसायाला “गोरख धंदा’ बनवले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड व मावळ परिसरात 54 मोठी रुग्णालये आहेत. धर्मादाय आयुक्‍तालयाचे नियम या सर्वच रुग्णालयांना लागू आहेत. त्यानुसार शहरातील नागरिकांना कमी खर्चात अत्याधुनिक उपचार मिळेल ही माफक अपेक्षा आहे. मात्र या रुग्णालयांमध्ये उपचारापेक्षा “फाईव्ह स्टार ट्रीटमेंट’वर जास्त भर देत आहे. रुग्णांसाठी “पॅकेजेस्‌’ त्यांनी ठरवून दिले आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा रुग्णालयात जाता तेव्हा तुम्हाला तुमच्या आजारानुसार नाही तर तुमच्या आर्थिक कुवतेनुसार वागणूक मिळते हे वास्तव आहे. रुग्णालये ही केवळ सेवा राहिली नसून तो एक साचेबद्ध व भरपूर उत्पन्न देणारा व्यवसाय बनला आहे. यामध्ये तुम्हाला साधा ताप जरी आला तरी मशीनद्वारे तपासणी, अमूक टेस्ट, तमूक सोनोग्राफी असा एक “चार्ट’ दिला जातो. उपचार, औषधे, विविध तपासण्या असे लाख भर बील झाल्याखेरीज रुग्णांची रुग्णालयातून सुटका होत नाही. कितीही अत्यावस्थ स्थितीमध्ये रुग्ण असला तरी आगाऊ पैसे आणि उपचारानंतर त्यांच्या जिविताला काही बरे-वाईट झाल्यास रुग्णालय जबाबदार नसेल, असे हमीपत्र रुग्णांच्या नातेवाईकांकडून घेतले जाते.

दवाखाना, रुग्णालय चालवणे हे आजच्या घडीला कमी कालावधीत सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय ठरत आहे. परिणामी शासकीय रुग्णालयांमध्ये काम करण्यास डॉक्‍टर तयार होत नाहीत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) तगडे मानधन मोजूनही डॉक्‍टर मिळत नाहीत. जे डॉक्‍टर सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या खासगी “प्रॅक्‍टीस’ कायम वादाच्या केंद्रस्थानी राहिल्या आहेत. आधुनिक उपचार, स्वच्छता, सर्व सुख-सुविधा आदी गोष्टी रुग्णांना मिळतात. त्यामुळे त्यासाठी जादा दर आकारणी हा आमचा हक्क असल्याचे खासगी रुग्णालयांचे म्हणणे आहे. मात्र, हे जरी सत्य असले तरी त्यामध्ये तुम्ही उपचाराला किती महत्व देता हा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. मृत्यूनंतर ही मृतदेह ताब्यात न देणे, बिलासाठी रुग्ण डांबून ठेवणे हे वैद्यकीय पेशाला शोभणारे नाही. राहता राहिला प्रश्‍न रुग्णांचा तर त्यांनीही सरकारी रुग्णालयांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. वायसीएम सारख्या रुग्णालयात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा आहेत. सर्वात महागडे उपचार ठरणाऱ्या हृदयरोग विभागासाठी महापालिकेने “पीपीपी’ तत्वावर खासगी रुग्णालयाची मदत घेतल्याने 50 टक्‍के सवलतीच्या दरात उपचार मिळणे शक्‍य झाले आहे. मात्र “व्हीआयपी’ लोकांच्या शिफारशीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी हट्ट धरला जातो. रुग्णांनीही अंथरुन पाहून पाय पसरलेले बरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)