“माणदेशी’ छावणीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात 

परजिल्ह्यातील जनावरांचा परतीचा प्रवास; साडे आठ हजार जनावरांचा प्रश्न ऐरणीवर 

सातारा,दि.29 प्रशांत जाधव 

म्हसवड ता. माण येथील माणदेशी फाउंडेशनमार्फत सुरू असलेली चारा छावणी आर्थिक आणीबाणी व पाणी उपलब्ध होत नसल्याने छावणीचालकांनी बंद करण्याचा निर्णय घेतल्याने माणदेशी जनतेच्या पोटात गोळा आला आहे. छावणी बंद होऊ नये. या खासगी छावणीचे शासकीय अनुदानित छावणीत रूपांतर होण्यासाठी, तसेच उरमोडीचे पाणी म्हसवड परिसरातील माणगंगेत येण्यासाठी आमदार जयकुमार गोरे, विजय सिन्हा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून छावणी पुढे चालु ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे विजय सिन्हा यांनी सांगितले.

माणदेशी फाउंडेशन संचलित जनावरांच्या चारा छावणीत जनावरांसोबत मुक्कामी असलेल्या गावांतील सुमारे चार हजार शेतकरी कुटुंबांसोबत शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत सिन्हा बोलत होते. यावेळी माणदेशी फाउंडेशनचे उपाध्यक्ष जवाहर देशमाने, करण सिन्हा, रवी वीरकर, आदी प्रमुख उपस्थित होते. सिन्हा म्हणाले, सध्या चारा छावणीत साडेनऊ हजार जनावरांना रोज सहा लाख लिटर पाण्याची गरज असून, म्हसवड भागात शोधूनही पुरेसे पाणीच उपलब्ध होऊ न शकल्यामुळे येथील माणदेशी फाउंडेशन संचलित जनावरांची चारा छावणी बंद करण्याचा दु:खद असा निर्णय घ्यावा लागत असल्याचे शल्य सिन्हा यांनी व्यक्त केले.

या छावणीत असलेल्या सुमारे दहा हजार जनावरांपैकी सोमवार दि.29 रोजी परजिल्ह्यातील म्हणजे सोलापूर, सांगली जिल्ह्यातील पाचशे जनावरांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आज (मंगळवारी) सुध्दा परजिल्ह्यातील सुमारे पाचशे जनावरांना त्यांच्या जिल्ह्यात नाईलाजाने परत पाठवले जाणार असल्याचे विजय सिन्हा यांनी सांगितले. माण तालुक्‍यात दुष्काळाच्या संकटामुळे जनावरांना चारा आणि पाणी मिळत नसल्याने दुभती जनावरे मिळेल त्या किमतीत शेतकरी विकत आहेत.

माणमधील शेतकऱ्यांना संकटातून वाचविण्यासाठी शासनाच्या निर्णयाची वाट न पाहता माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमातून चालु वर्षी एक जानेवारीपासून जनावरांची छावणी सुरू करण्यात आली होती. त्यासाठी मुंबई येथील बृहत भारतीय समाज व बजाज कंपनीने आर्थिक मदतीचा हात पुढे केला होता. मात्र आज अखेर या छावणीत सुमारे साडेनऊ हजार जनावरे व त्यासोबत चार हजार कुटुंबे गेली साडेतीन महिने मुक्कामी आहेत. त्यातच सरकार दरबारी गेली चार महिने सुरू असलेल्या या छावणीला कोणताही मदतीचा हात पुढे केला जात नसल्याने छावणी चालकांच्यापुढे हे सगळे कसे सांभाळायचे असा यक्ष प्रश्‍न निर्माण झाल्यानेच त्यांनी छावणी बंदचा निर्णय घेतल्याचे कळते आहे.

छावणी चालकांच्या या निर्णयाला आमदार जयकुमार गोरे यांनी गांभीर्याने घेत, मुख्यमंत्र्यांशी दुरध्वनीवरून चर्चा करून परिस्थीती त्यांच्या कानावर घातली. मुख्यमंत्र्यांनी आमदार गोरे यांना सकारात्मक निर्णय दिला असून, लवकरच मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर माणदेशी छावणीचे भवितव्य अवलंबुन आहे.

बोलक्‍या ताकदीचा उपयोग मुक्‍यांच्या कामी येणार का?
माण मतदार संघात सर्वच पक्षातील ताकदवार नेत्यांचा वावर आहे. भाजप,राष्ट्रवादी,कॉंग्रेस,शिवसेना या पक्षांचे नेते आहेत. हेच नेते खासगीत अनेकदा मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांच्या किती जवळाचा आहे याचा उल्लेख करत असतात. नेमका त्याच ताकदीचा उपयोग मुक्‍या जनावरांसाठी व्हावा म्हणून माण मतदार संघातील नेते प्रयत्न करतील का?

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.