माढ्यात मतदानासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी

कोळकी, दि. 22 (वार्ताहर) – माढा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून मतदान प्रक्रिया शांततेत व निर्विघ्नपने पार पडण्यासाठी फलटण तालुक्‍यातील शासन यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघात एकूण 342 मतदान केंद्रे असून या केंद्रांसाठी 3213 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 55 जीपसह अन्य गाड्या, 6 ट्रक, 51 एसटी बसेस अशी एकूण 112 वाहने नियुक्त करण्यात आली आहेत. दि. 23 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

मतदान ओळखपत्राशिवाय इतर 11 छायाचित्र असणारे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. 255 फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी एकूण 342 मतदान केंद्रे असून यामध्ये फलटण तालुक्‍यातील 298 केंद्रांचा व कोरेगाव तालुक्‍यातील उत्तर कोरेगाव मधील 44 मतदान केंद्रांचा समावेश आहे. मतदार संघात 1 लाख 70 हजार 387 पुरुष मतदार, 1 लाख 59 हजार 775 महिला मतदार, 1 हजार 730 दिव्यांग मतदार असे एकूण 3 लाख 30 हजार 163 मतदार आहेत. 42 क्षेत्रीय अधिकारी, 3 राखीव क्षेत्रीय अधिकारी असे एकूण 45 अधिकारी नेमण्यात आले आहेत. मतदान केंद्रांवर एक केंद्राध्यक्ष, एक सहाय्यक केंद्राध्यक्ष, दोन मतदान अधिकारी, शिपाई व पोलीस कर्मचारी असे एकूण 2 हजार 52 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी 10 टक्के कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत.

एकंदरीत 3 हजार 168 एवढे कर्मचारी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण 864 बॅलेट युनिट, 432 कंट्रोल युनिट, 449 व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे उपलब्ध करण्यात आलेली आहेत. प्रत्यक्ष मतदानासाठी 342 मतदान केंद्रावर मतदानासाठी 342 मतदान यंत्रे सिलिंग केलेले आहेत. 65 मतदान यंत्रे राखीव ठेवण्यात आलेली आहेत. याचबरोबर 342 बीएलओ, 221 आशा सेविका व 660 स्वयंसेवक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदान प्रक्रियेसाठी 6 भरारी पथके, 12 स्थीर, 5 व्हिडिओ सर्विलन्स, 2 व्हिडिओ व्हीव्हींग टिम अशा एकूण 25 पथकांची नेमणूक केली आहे. मतदान यंत्रे व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी 55 जीपसह विविध गाड्या, 6 ट्रक, 51 एसटी बसेस अशी एकूण 112 वाहने नियुक्त करण्यात आली आहेत. अपंग मतदारांसाठी 104 ऍटोरिक्षांची व 129 व्हिल चेअरची सोय करण्यात आली असून मतदान यंत्र वाटप व स्वीकारण्यासाठी एकूण 30 टेबल ठेवण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जाधव यांनी दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.