माझ्या मनातला श्रावण

श्रावण महिना म्हणजे ऊन-पावसाचा खेळ, पण श्रावण म्हटल्यावर माझ्या मनात उभा राहतो अजूनही जपून ठेवलेला, समुद्राकाठी असलेल्या, माझ्या चिमुकल्या आणि त्याकाळी कोणालाही फारसे माहीत नसलेल्या नारळी-पोफळीच्या टुमदार वाड्यांनी नटलेल्या माझ्या गावातला-दिवे आगरमधला हिरवागार श्रावण! ऊन-पावसाच्या खेळांबरोबरच मंगळागौरीच्या खेळांचा महिना, पोखरणीच्या, विहिरींच्या पाण्यात मनसोक्त पोहोण्याचा महिना. सण, व्रतवैकल्यांचा तर हा महिना म्हणजे मुकुटमणीच! पण मला मात्र तो आवडत असे, ते मिळणाऱ्या सुट्ट्यांमुळेसुद्धा.

श्रावणी सोमवारी शाळा लवकर सुटत असे त्यामुळे खेळायला थोडा जास्त वेळ मिळे. त्यात पूर्ण भरलेल्या विहिरीत, पोखरणीत पोहोणे आणि पार तळापर्यंत बुडी मारून “खर’ काढणे याचा नंबर पहिला! त्यानंतर पंचमुखी किंवा उत्तरेश्‍वराच्या देवळात जाऊन भगवान शंकराचे दर्शन घ्यायचे. मैत्रिणींबरोबर गप्पा मारत जायचे नि यायचे. क्वचित एखादी सर पडून गेली असेल तर छानच! कारण मग रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या हलवून स्वतःबरोबर मैत्रिणींच्या अंगावरही जलाभिषेक करता येई. रस्त्यावर साठलेल्या लाल पाण्यात पांढऱ्याशुभ्र पाण्याचे “मोदक’ पडताना पाहणे नि ऐकणे मोठे आनंददायक असते. रस्त्यावर लालमातीत उगवलेल्या रानअळूचा ताफा असे. त्याची पाने तोडून फोडायला मधल्या तुऱ्याची पिपाणी करून वाजवायला फार फार मज्जा येई. गावातले बालपण असे अनेक नैसर्गिक आवाजांनी, नादांनी भरलेले असणे, निसर्गाचे मुक्त छंदसंगीत ऐकता, अनुभवता येणे आणि यासाठी पुरेसा वेळ हाताशी असणे यापरते दुसरे भाग्य ते कोणते! अर्थात आता अविश्‍वसनीय वाटतील अशी काही कामेही असत. उदा. कंदिलांच्या काचा लख्ख पुसणे, वातींची काजळी काढून, वात कापून नीट करणे, रॉकेल भरणे आणि कंदील तयार करून ठेवणे, अंधार पडायच्या आत अंगणात बसून मित्र-मंडळींसमवेत “सामुदायिक अभ्यास’ करणे! आई शेतावरून घरी आली असेल तर मग अंगणात एक दोनदा डोकावून “अभ्यासा’वर पाहणी करून जाई. “पालकांनी फार लक्ष घातले नाही तर मुले आपलं-आपलं छान करतात,’ हा धडा फार लहानणीच मला कळला; त्याचा आता एक “आई’ म्हणून नि शाळेत “बाई’ म्हणून फार फार उपयोग होत आहे. त्यासाठी पावसाळ्याला, श्रावणाला धन्यवाद द्यायलाच हवेत! म्हणूनसुद्धा श्रावण मी मनात जपून ठेवलाय.

प्रत्येक मराठी महिन्याला आपला आपला खास रंग नि सुवास असतो. जसे चैत्राला चाफ्याचा रंग नि वास तसे माझ्या मनातल्या श्रावणाला गुलबक्षीच्या विविध रंगांचा नि टाकळा, भारंगी, सोनटक्का, कणेरीचा वास आहे. “या दिवसांत गुलबक्षीच्या फुलांचा देठ चांगला लांब असतो. त्यामुळे वेणी छान करता येते’ असं सांगत आजीने गुलबक्षीच्या वेणीचे साधी, तोड्याची आणि निरांजनी असे तीन प्रकार आणि निसर्गाचं, पाना-फुलांचं वाचन करायला शिकवलं ते या श्रावणातच! “उपळ’ झालेल्या वाडीतून गुडघा-गुडघा पाण्यातून चालत जाणे, चालताना आपल्याबरोबरच सुळसूळ जाणारे बेडूक, एखाद-दुसरा साप बघणे, गोगलगायी, त्यांचे शंख, त्यांनी कुरतडलेल्या पानांमध्ये आकार शोधणे हेही आवडीचे उद्योग! नशीब म्हणजे आम्हा मित्रमंडळींच्या कोणाच्याही आई-वडिलांना “सर्दी होईल… ताप येईल…’ इ. गोष्टींची बाधा झाली नव्हती. त्यामुळे श्रावणाचा आनंद मनमुराद घेता आला. “टाकळ्याची पाने मिटली म्हणजे सूर्य मावळला,’ हे ज्ञानदेखील अलगदपणे मिळालं.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऊन-पावसाचं देखणं शिल्प चितारणाऱ्या या श्रावणात अजून रंग भरणाऱ्या गोष्टींपैकी एक म्हणजे मंगळागौरीचे (स्वत:) खेळले जाणारे खेळ! पहाटेपर्यंत मंगळागौर जागवली जात असे. पोरी-सोरी आणि म्हातारी-सगळे खेळत असत. साधा झिम्मा, दुहेरी झिम्मा, लाडू झिम्मा, विविध फुगड्या, नारळाच्या करवंट्या, लाटणी, सूप वापरुनचे खेळ, गाठोडे हा जरा अवघड प्रकार आणि फुगडी खेळताना घालायचा “पकवा’ आणि उखाणे! खेळता-खेळता पहाट कधी व्हायची, ते कळायचेही नाही. घरी आल्यावर 2-3 तास झोप मिळे, पण ती आम्हाला! आई, काकू यांचा मात्र पुढचा दिवस सुरू झालेला असे. त्यांना झोप मिळायची ती एकदम रात्रीच! पण कधी त्यांना थकलेले पाहिले नाही. एवढी ऊर्जा, कामाचे बळ कुठून मिळवत होत्या कोण जाणे! आता याचे आश्‍चर्य वाटते.

दुसरी रंग भरणारी गोष्ट म्हणजे गोकुळाष्टमी! गणपतीच्या देवळापासून “गोविंदा’ सुरू होई. घरोघरी अंगणात जाऊन “गोविंदा’ नाचून जाई. त्यासाठी घरोघरी अंगणात कोमट आणि थंड असे पाणी भरलेले असे. त्यात रंग टाकले जात. ते अधिक “टिकाऊ’ व्हावेत म्हणून केळीच्या सोपटाच्या पाण्यात ते मिसळायचे. हा रंग करतानाही गंमत येई, पण केळ्याच्या सोपटामुळे हाताला मात्र “टिकाऊ’ काळा रंग चिकटे. मग आपल्या अंगणात गोविंदा कधी येतो याची वाट बघणे सुरू होई. अखेरीस गोविंदा येई आणि त्या फळीतले सगळे “नित्याचे परिचित’ रंगांमुळे “अपरिचित’ होऊन गेलेले असत. पण पूर्ण झोकून देऊन, ओले होऊन, भान विसरून नाचताना या सर्वांना पाहून “आपण मात्र असे करू शकत नाही. कारण महिलांचा गोविंदा (निदान राधा!) नसतो. याचे वाईटही वाटे. पण याची कसर “गोपाळकाल्या’चा प्रसाद भरून काढी.

श्रावणातल्या प्रत्येक सणाला खास वैशिष्ट्य आहे. आरोग्यविचार आहे, अध्यात्मिकताही आहे. सगळा महिनाच मुळी सणवार, आनंदाचा; पण “शेतकऱ्याचा मित्र आहे’, हे माहीत असूनही अनेकदा या “मित्रा’चे जवळून, लोभस दर्शन होऊनही फारसा मला न आवडलेला सण म्हणजे नागपंचमी! कापायचं नाही, तोडायचं नाही, खणायचं नाही, अशा “न’कारांच्या यादीमुळे “मग करायचं तरी काय?’ कारण शाळेला तर सुट्टी असे! पण नागांची चित्रे चंदनाने काढणे, कहाणी वाचणे आवडे.

पौर्णिमेला रक्षाबंधन आणि समुद्राला नारळ द्यायला जायचे. बघता बघता आनंद श्रावण सरत जायचा आणि यायची दिवली अवस! दिव्यांची पूजा करायची, कहाणी वाचायची.

पण माझ्या मनात मात्र बालपणीच्या रम्य काळातल्या, देखण्या गावातल्या जीवाभावाच्या श्रावणातल्या या दीपज्योती अजून तेवताहेत. निराश वाटलं काही मनाला टोचलं तरी अजूनही डोळे मिटल्यावर त्या मनाचा आसमंत उजळून टाकतात. आजही माझं मन जेव्हा, आजारी पडतं तेव्हा पुन्हा मी मनातल्या “श्रावणात’ जाते. तिथलं आभाळ ढगांनी भरून गेलेलं असतं. पावसाच्या सरीमुळे आजूबाजूचं काऽऽऽही ऐकू येत नसतं. झडीमुळे दारं, खिडक्‍या बंद असतात. आणि माजघरातल्या देवघरात निरांजन आणि दिवे शांत तेवत असतात. आजूबाजूचा अंधकार तेजाळून जातो आणि माझं मनसुद्धा!

– आभा अभ्यंकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)