माझ्या आठवणीतील गुरु : प्रा.अनंतराव नखाते (प्रभात open house गुरुपौर्णिमा विशेष)

उपप्राचार्य प्रा.अनंतरावजी नखाते सर यांचा एकूण सेवाकाल 34 वर्षे आहे. प्रा.नखाते सर हे माझे गुरु आहेत. मला त्यांनी 11 वी ते बी.एस्सी.पर्यंत प्राणीशास्त्र हा विषय उत्कृष्टपणे शिकविलेला आहे. सरांबद्दल सांगायचे झाले तर ते एक उत्कृष्ट खेळाडू, मल्ल, उत्कृष्ट प्रशासक, कुशल मार्गदर्शक, मितभाषी, अभ्यासू, कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, निर्व्यसनी, विद्यार्थीप्रिय, पालकप्रिय, कुशाग्रबुद्धीचे, भविष्याचा वेध घेणारे, अतिशय धूर्त व सहकारीप्रिय असे हे माझे गुरु एक आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत.

सरांचे अध्यापन कौशल्य हे वाखणण्याजोगे व प्रभावी होते. प्रत्येक संकल्पना स्पष्ट होत्या. बोलण्यातील चढ-उतारपणा, शैक्षणिक साहित्यांचा वापर करणे, पूर्ण अभ्यास करुन तयार करुनच वर्गावर जात असते, प्रसंगी गुंडाळ फळ्याचा वापर करत, अध्यापन करण्याअगोदरच त्या भागाची आकृती रंगीत खडूने गुंडाळ फळ्यावरती रेखाटून ती वर्गामध्ये लावून मगच शिकवायचे. एखाद्या प्राण्याचे, पक्ष्यांचे मॉडेल व त्याचे बाह्यगुणधर्म विद्यार्थ्यांना सरळ, साध्या, सोप्या भाषेत रुचेल-पचेल असे शिकवायचे. यामुळे गरीब, अभ्यासात कच्चे असलेले विद्यार्थ्यांना सहज समजत असे. त्यांनी प्रभावीपणे केलेल्या अध्यापनामुळे अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, वकील, न्यायाधीश, पोलिस निरीक्षक, पोलिस उपअधिक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, उत्कृष्ट उद्योगपती, व्यावसायिक असे अनेक क्षेत्रात आज नावलौकिक मिळवत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रा.नखाते सर थेअरी व प्रॅक्टिकल शिकविताना शैक्षणिक साहित्यांचा वापर तर पुरेपूर करतच होते. याबरोबरच प्रात्यक्षिकांच्या अगोदरच प्राण्यांचे डिसेप्शन स्वतः करून पहायचे व जेवढे उत्कृष्टपणे करुन विद्यार्थ्यांना दिग्दर्शित करता येईल याचा कसोशीने प्रयत्न करत असत. मग ते गांडुळाच्या वेगवेगळ्या संस्था असतील, बेडूक, झुरळे, मासे, तारामासा, सेपिया, लॉलीगो, स्कॉलिओडॉन, लीच (जळू), सरडा, इत्यादी प्राण्यांच्या संस्थांची आकृतीप्रमाणे डिसेक्शन करुन दाखवायचे आणि ते विद्यार्थ्यांच्या सदैव स्मरणात राहायचे व ते विद्यार्थ्यांकडून करुन घेतल्याशिवाय लॅब सोडून जाता येत नव्हते. पूर्ण वेळ प्रात्यक्षिक घ्यायचे. असे अनेक उदाहरणं आहेत. सरांचे राहणीमान ही अत्यंत साधे एका शिक्षकी पेशाला शोभेल असेच असायचे. त्यांनी कधीही कोणालाही दुखवले नाही. कोणाला त्रास होईल किंवा आपल्यामुळे कोणी नाराज होईल असे वर्तन सरांकडून कधीही झाले नाही. अतिशय शांत, प्रेमळ, मनमिळावू, सर्वांना विश्वासात घेवून ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. अशी जाणीव, अशी भावना निर्माण करुन सहकार्‍यांबरोबर गोडी गुलाबीने हसत खेळत काम करुन घ्यायचे व तेही काम करायचे. एकंदरीत त्यांच्या वागण्यात, चालण्यात, बोलण्यात कधीही दुजाभाव जात-पात, मीपणा असे दुरुनही त्यांच्या स्वभावात जाणवत नव्हते म्हणून म्हणावेसे वाटते-

‘माणसाच्या परिचयाची सुरुवात

जरी चेहर्‍याने होत असली तरी

त्याची संपूर्ण ओळख ही

वाणी, विचार आणि कर्मानीच होते’

“सोन्याचा साठा करुन मिळविलेल्या श्रीमंतीपेक्षा

तुमच्यासारखी सोन्याहून मुल्यवान

 माणसांचा साठा आमच्याकडे आहे

हीच खरी श्रीमंती आहे. …!

नेहमी पैशापेक्षा माणुसकीच श्रेष्ठ ठरते. ”

तसे गुरु-शिष्यांचे आमचे नाते दृढ आहे. सर सद्या पीएच.डी.चे संशोधनही करत आहेत व त्यांचे दोन संशोधन पत्रिकाही प्रकाशित झालेल्या आहेत व लवकरच फायनल शिनॉप्सीस सादर करणार आहेत. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे अध्यात्मिक कार्य (सर वारकरी आहेत) शैक्षणिक, अभ्यासकार्य, संशोधन, सामाजिक, राजकीय कार्य करत राहणार आहेत.  प्रा.नखाते सरांच्या धर्मपत्नी सौ.छायाताई याही एक आदर्श माता म्हणून कार्य करत आहेत. त्यांचीही खंबीर साथ त्यांना मिळाली यामुळेच त्यांची कन्या डॉ.सौ.आश्विनीताई चारुदत्त शितोळे या एम.बी.बी.एस. डॉक्टर व जावई सुद्धा डॉक्टर आहेत. सरांचा एक मुलगा  चि.अनिकेत नखाते इंजिनियर आहे तर दुसरा चि.मनोज नखाते एम.एस्सी.बी.एड. प्राणीशास्त्र असे उच्चशिक्षित आहेत ते केवळ त्यांचे वडील प्रा.नखाते सर हे उत्कृष्ट शिक्षक/अध्यापक असल्यामुळेच हे आवर्जूून येथे नमूद करावेसे वाटते. सर अगोदर शिक्षक होते व नंतर प्राध्यापक झाले. यामुळेच त्यांचे अध्यापन कौशल्य खूप विकसित होते असे म्हणावे लागेल. प्रा.नखाते सरांसाठी म्हणावेसे वाटते की तत्कालीन शिक्षण संचालक वि.वि.चिपळूनकरांनी जी शिक्षकांची आचार संहीता सांगितलेली आहे. ती अशी

“ मी एक शिक्षक आहे,

शिकवणे हा आमचा स्वधर्म आहे,

शाळा-महाविद्यालये हे आमचे मंदिर आहे,

विद्यार्थी हे आमचे देव-देवता आहेत.

दुरितांचे तिमिर जावो, हीच आमुची प्रार्थना आहे,

समाजाचा आशिर्वाद हाच आमुचा प्रसाद आहे. ”

म्हणून चांगली माणसं आपल्या जीवनात येणं ही आपली ‘भाग्यता’ असते आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं हे आपल्यातली ‘योग्यता’ असते.  प्रा.अनंतराव नखाते सरांच्या सेवागौरव समारंभादिनी मी माझे मनोगत व्यक्त करु शकलो नाही कारण वक्ते जास्त होते. त्यामुळे माझे मनोगत या लेखाद्वारे संपूर्ण सरांच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा खटाटोप केला आहे व माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. शेवटी त्यांचे नावच अनंत आहे  व या नावाप्रमाणेच त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे अनंत पैलू आहेत. अशा या प्रा.नखाते सरांना उदंड आयुष्य लाभो हीच पांडूरंगांच्या चरणी प्रार्थना करतो.

– प्रा.डॉ.महादेव काळे (सहयोगी प्राध्यापक, प्राणीशास्त्र), बीड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)