माझा अर्ज म्हणजे “शिरूर’मधल्या प्रत्येकाचा अर्ज -डॉ. कोल्हे

अभूतपूर्व गर्दीत डॉ. अमोल कोल्हे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

पुणे -शिरूर लोकसभेसाठी भरलेला अर्ज हा शिरूर लोकसभा मतदार संघातल्या प्रत्येकाचा अर्ज आहे. देशात परिवर्तनाची लाट असून, शिरूर लोकसभेमध्येही परिवर्तन अटळ आहे. माय-बाप मतदारांनी संधी दिली तर, संसदेमध्ये शिरूर लोकसभेतील हमीभावासाठी झगडणाऱ्या शेतकऱ्यांचा आवाज घुमेल, तसेच हा आवाज बंद झालेल्या बैलगाडा शर्यतीतल्या बैलगाडा मालकांचा, माता-भगिनींचा आवाज असेल, असा ठाम विश्वास देत डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदार संघातील कळीच्या मुद्द्यांना हात घालत आज अभूतपूर्व गर्दीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार विलास लांडे, पोपटराव गावडे व अशोक पवार, मंगलदास बांदल, सुरेश घुले, चेतन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार यांनी शेतकरी कुटुंबातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुणाला शिरूर लोकसभेची उमेदवारी देऊन मोठी संधी दिली आहे. आज माझा उमेदवारी अर्ज भरत नसून शिरूर लोकसभा मतदार संघातल्या प्रत्येकाचा अर्ज भरतोय, असे सांगून डॉ. कोल्हे म्हणाले की, देशात परिवर्तनाची लाट आहे. हा देश सर्वांचा असून या देशाला आई मानणाऱ्या प्रत्येकाचा तो आहे. संविधानाने दिलेले हक्क अबाधित राखण्यासाठीची ही लढाई आहे. फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांनुसार चालणाऱ्या महाराष्ट्रासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. महाराजांनी निर्मिलेल्या स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी मी कटीबद्ध राहणार आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातल्या मतदारांनी त्यासाठी संधी द्यावी, असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.