माजी महापौरांमध्ये सभागृहातच “शाब्दिक चकमक’

पिंपरी- पिंपळे गुरव येथील मंदिर दुर्घटनेवर सभागृहात चर्चा सुरु असतानाच सभागृह नेत्यांच्या मनोगतानंतर सभाशास्त्राप्रमाणे कोणत्याही सदस्याला मनोगत व्यक्‍त करता येत नसल्याचा माजी महापौर मंगला कदम यांनी वारंवार आक्षेप घेतला. त्यावर संतापलेले माजी महापौर नितीन काळजे यांनी उगाच आकडतांडव करू नका. मला बोलायचा तुमचा संबंध नाही. मी बोलायचे का नाही, ते तुम्ही सांगायची गरज नाही. ते मला महापौर सांगतील, अशी शाब्दिक चकमक दोन्ही माजी महापौरांमध्ये उडाली. हे ऐकून काही वेळ सभागृह देखील अवाक्‌ झाले. शेवटी महापौर राहुल जाधव यांनी मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकला.

महापलिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकूब सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. 22) पार पडली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. पिंपळे गुरव येथील महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु असताना दगडी सभामंडप कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला. हे मंदिर बेकायदा असल्याने याचे पडसाद सभागृहात उमटले. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी या विषयावरील चर्चेला सुरुवात केली. ते म्हणाले की, नदीपात्रातील मंदिराच्या अनधिकृत बांधकामाकडे महापालिका प्रशासनाकडून अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्याची किंमत तीन मजुरांना आपले प्राण देऊन मोजावी लागली आहे. त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्मशानभूमीचे काम सुरू असून, त्या कामाची रक्कम या मंदिराच्या कामासाठी वापरल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील, त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ही दुर्घटना घडली आहे. हा भावनिक विषय असून, या मंदिराला आमचा विरोध नाही. मात्र, या मंदिराचे काम सुरू असताना महापालिका प्रशासन काय झोपले होते का? असा सवाल उपस्थित करत दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली. सचिन चिखले आणि अजित गव्हाणे यांनी शहरातील मंडळांचा आढावा घेऊन, मंदिर उभारण्यासाठी असणारी प्रक्रिया सुटसुटीत करण्याची मागणी सभागृहात केली. शशिकांत कदम यांनी या मंदिराचे काम जीर्णोद्धार समितीच्या मार्फत होत असून, अन्य कोणाकडूनही पैसा घेतला नसल्याचे सांगितले. तसेच लोकवर्गणीतून हे काम पूर्ण होत असल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. शहरातील मंडळांचा आढावा घेऊन, बांधकाम नियम प्रक्रियेत शिथिलता आणता येऊ शकले का ? याची पडताळणी केली जाईल. भावना जपून तो विषय मार्गी लावू, असे आश्‍वासन महापौर जाधव यांनी यावेळी दिले.

तडजोड करणारे नगरसेवक सभागृहातच : सभागृह नेते
दरम्यान, या घटनेवरून राजकारण होत असल्याबद्दल सभागृह नेते एकनाथ पवार यांनी संताप व्यक्‍त केला. तडजोड करणारे अनेक नगरसेवक या सभागृहात आहेत. या भावनिक विषयाचेदेखील राष्ट्रवादीकडून राजकारण केले जात असून, पिंपळे गुरव परिसर म्हटला की टिका करायची एकही संधी सोडायची नाही. दोन महिन्यांवर आलेली निवडणुक डोळ्यासमोर ठेवून दत्ता साने यांच्याकडून राजकारण केले जात आहे. भावनिक विषयात तरी साने यांनी चांगला विचार करावा, असे पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.