माजी आमदार वसंतराव थोरात यांचे निधन

वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार : विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

पुणे – कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते, अखिल मंडई मंडळाच्या माध्यमातून पुण्याच्या गणेशोत्सवाला विधायक वळण लागावे यासाठी आयुष्यभर झटणारे माजी महापौर आणि माजी आमदार वसंतराव विठोबा ऊर्फ तात्या थोरात यांचे गुरुवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे. अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात हे त्यांचे पुतणे होत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दम्याचा त्रास होऊ लागल्यामुळे पाच दिवसांपूर्वी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच पहाटे त्यांचे निधन झाले. थोरात यांच्या पार्थिवावर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

मंडईमध्ये भाजी विक्रीसाठी येणारे शेतकरी आणि हमाल यांना एक रुपयात भोजन मिळावे या उद्देशातून तात्यांनी बंधू अप्पा थोरात आणि मधुकर थोरात यांच्या सहकार्याने राज्यातील पहिले “झुणका-भाकर’ केंद्र मंडईत सुरू केले होते. मुंबईचे महापौर असताना मनोहर जोशी यांनी या केंद्राला भेट दिली. येथून प्रेरणा घेऊन त्यांनी संपूर्ण मुंबईत सेना-भाजप सरकारच्या काळात झुणका-भाकर केंद्र योजना सुरू केली होती.

महापौरपदाच्या कालावधीत तात्यांनी आपले मानधन हमाल पंचायतीच्या झुणका-भाकर केंद्रासाठी दिले होते. समर्थ रामदासस्वामी यांचे अनुयायी असलेल्या तात्यांनी पुणे-सज्जनगड बससेवा सुरू केली होती. श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार, सद्गुरु शंकर महाराज ट्रस्टचे विश्वस्त आणि बदामी हौद संघाचे अध्यक्ष अशा माध्यमातून तात्या सार्वजनिक जीवनात कार्यरत होते.

अशी होती वसंतराव थोरातांची कारकीर्द
वसंतराव थोरात यांचा जन्म 16 ऑगस्ट 1941 रोजी झाला. स.प. महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करत असतानाच अखिल मंडई मंडळाच्या माध्यमातून ते सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी भारलेले तात्या कॉंग्रेसचे सच्चे कार्यकर्ते झाले. 1968 मध्ये त्यांनी महापालिकेची निवडणूक लढवली. मात्र प्रतिस्पर्धी असलेल्या अण्णा जोशी यांच्याकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला. पक्षाचे शहराध्यक्षपद भूषविलेल्या तात्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, चुरशीच्या निवडणुकीत 1972 मध्ये जनसंघाच्या रामभाऊ म्हाळगी यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर म्हाळगी यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये दिलदारपणाने तात्यांनी रामभाऊ यांना हार घालून त्यांनी राजकारणातील उदारतेचे दर्शन घडविले. 1974-75 मध्ये तात्यांनी यांनी पुण्याचे महापौरपद भूषविले. आणीबाणीनंतरच्या काळात 1977च्या लोकसभा निवडणुकीत ते कॉंग्रेसचे उमेदवार होते, मात्र देशभरात कॉंग्रेसविरोधी लाट असल्यामुळे मोहन धारिया यांनी त्यांचा पराभव केला. अण्णा जोशी यांची खासदारपदी निवड झाल्यामुळे कसबा विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये तात्या विजयी झाले. मात्र, आमदारकीची कारकीर्द संपल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)