माऊलींची वारी, मल्हारीच्या द्वारी

जेजुरी –
सोन्याची जेजुरी
तेथे नांदतो मल्हारी
माझा मल्हारी मल्हारी
आलो तुमच्या दारी द्यावी
आम्हा वारी बेलभंडाराची
अशी ओवी गात संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी (दि. 30) सायंकाळच्या सुमारास जेजुरीनगरीत मल्हार चरणी विसावला. पालखी सोहळ्याचे मल्हारनगरीत आगमन होताच जेजुरी नगरपालिका, श्री मार्तंड देवसंस्थान व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने पालखी सोहळ्यावर व विविध दिंड्यात सहभागी असलेल्या वैष्णवांवर भंडाऱ्याची उधळण करीत स्वागत करण्यात आले.

रविवारी सकाळपासूनच सासवड-जेजुरीचा सतरा किलोमीटरचा राज्यमार्ग वैष्णवांनी फुलून गेला होता. जेजुरीचा मल्हारगड नजरेच्या टप्प्यात येताच येळकोट येळकोट जयमल्हार, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी असा एकच गजर दिंड्या-दिंड्यामधून घुमत होता. कडेपठार कमानीनजीक जेजुरी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मुख्याधिकारी संजय केदार, नगरसेवक, नगरसेविकांनी पुष्पहार अर्पण करून पालखी सोहळ्याचे स्वागत केले. मुख्य चौकात श्री मार्तंड देवसंस्थानच्यावतीने स्वागत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.