माउलींच्या अश्‍वांचे अलंकापुरीत आगमन

आळंदी : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर महाराजांच्या रथापुढील मानाचे अश्‍व सोमवारी (दि. 24) सायंकाळी पाच वाजता आगमन झाले. आळंदीच्या वेशीवर जुन्या पुलाजवळ सरदार बिडकर यांच्या वाड्यात प्रथम अश्‍वांचे स्वागत काही काळ विश्रांती घेतल्यानंतर अश्‍वांचे पूजन तसेच बिडकर परिवारातील महिलावर्गाकडून अश्‍वांचे औक्षण करण्यात आले.
गेली अनेक वर्षांपासून ही अश्‍व पूजनाची परंपरा बिडकर परिवार जपत आहेत. अंकली (कर्नाटक) येथील अश्‍वांचे मालक सरदार ऊर्जितसिंह शितोळे सरकार व सरदार महादजी शितोळे यांचे स्वागत करून अश्‍वांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या शेकडो भाविकांना चहापानासह प्रसाद वाटप करण्यात आले, असे उमेश बिडकर यांनी सांगितले. तासाभराच्या बिडकर वाड्यातील विश्रांतीनंतर वेशीवर अश्‍व आल्याचा निरोप देवस्थानकडे पाठविण्यात आला नंतर देवस्थानचे सर्व विश्‍वस्त चोपदार विणेकरी टाळकरी आदी घटक हे अश्‍वांच्या स्वागतासाठी दहीभाताचा नैवेद्य घेऊन
टाळ-मृदंगाचा गजर करीत आळंदीच्या वेशीवर म्हणजेच बिडकर वाड्याजवळ आल्यानंतर तेथे अश्‍वांना नैवेद्य देऊन शितोळे सरकारांचे आगमनाचे देवस्थानच्या वतीने टाळ-मृदंगाच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर “पुंडलिक वरदे हरी विठ्ठला’चा गजर करीत अश्‍वांना राम घाट मार्गे माऊली मंदिरात नेण्यात आले. यावेळी अश्‍वांची दर्शन घेण्यासाठी राज्य परिसरातून आलेल्या हजारो भाविकांनी एकच गर्दी केली होती. मंदिरात मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर आरती होऊन पहिल्या मुक्‍कामासाठी अश्‍व मुंबई फुलवाले धर्मशाळा येथे प्रतिवर्षीप्रमाणे मुक्‍कामाच्या ठिकाणी विसावले.
यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त ऍड. विकास ढगे पाटील, पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, विश्‍वस्त अजित कुलकर्णी, ऊर्जितसिंह शितोळे सरकार, भाऊ महाराज फुरसुंगीकर, चोपदार राजाभाऊ चोपदार, पप्पूशेठ भळकट, मनोहर दिवाणे, डॉ. जी. टी. जोशी व सिणगारे आदींसह भाविक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.