माउलींचे आज पंढरीसाठी प्रस्थान

दिंडी, पालखीसमवेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आळंदीत दाखल

आळंदी – मोक्षाचं प्रवेशद्वार असलेली नगरी अर्थात अलंकापुरी! संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. मंगळवारी (दि. 25) संध्याकाळी चार वाजता पालखी प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम सुरू होणार असून सायंकाळी 6.30 वाजता पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. त्यानंतर रात्री 9 वाजता पालखी पहिल्या मुक्‍कामासाठी गांधीवाड्यात (आजोळघरी) प्रवेश करणार आहे. या सोहळ्यासाठी आळंदीकरांसह देवसंस्थान व प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. तर पालखी सोहळा बुधवारी (दि. 26) सकाळी सहा वाजता पुण्याकडे प्रस्थान ठेवणार असून बुधवारी व गुरुवारी (दि. 27) पालखी सोहळा पुण्यात मुक्‍कामी असणार आहे.

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्यास ज्येष्ठ वैद्य अष्टमीला पहाटे चारपासून प्रारंभ होणार आहे. विठूमाऊलींची आस लागलेले लाखो वैष्णव मंगळवारी (दि. 24) माऊलींच्या पालखीसह पंढरीच्या वाटेवर प्रस्थान ठेवणार आहेत. आनंददायी असणाऱ्या वैभवी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होऊन याची देही अनुभवण्यासाठी राज्यभरातून असंख्य वारकऱ्यांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली आहे.

सारे भाविक प्रस्थान सोहळ्याच्या तयारीत मग्न आहेत. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली असून वारकऱ्यांच्या दर्शनबारीत रांगा लागल्या आहेत. पासव्यतिरिक्‍त भाविकांना
महाद्वारातून प्रवेशास मज्जाव करण्यात आल्याने मंदिराच्या नवीन दर्शनबारीतून भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. दरम्यान, आळंदीकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर दिंड्यांचे वास्तव्य आहे. पायी येणाऱ्या दिंड्यांना गावोगावी चहा, पाणी, फराळ, जेवणाची व्यवस्था केली जात आहे.

असा असेल प्रस्थान सोहळा…
मंगळवारी (दि. 25) पहाटे 4 वाजता घंटानाद, 4.15 काकडा, पहाटे 4.15 ते 5.30 पवमान अभिषेक, पंचामृत पूजा व दुधारती, 5 ते सकाळी 9 पर्यंत भक्‍तांच्या महापूजा व समाधी दर्शन. सकाळी 9 ते 12 पर्यंत भाविकांना समाधीस्थळाचे दर्शन व वीणा मंडपात कीर्तन, दुपारी 12 ते 12.30 गाभारा स्वच्छ करणे, समाधीस पाणी घालणे व श्रींना महानैवेद्य, दुपारी 12.30 ते 2.30 पर्यंत भाविकांना समाधीचे दर्शन. दुपारी 2.30 ते 3 वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मानाच्या 47 दिंड्यांना मुख्य महाद्वारातून प्रवेश. दरम्यान, “श्रीं’ना पोषाख घालण्यात येईल.

दुपारी 4 वाजता मुख्य प्रस्थान सोहळ्याला सुरुवात. श्रीगुरू हैबतबाबा यांच्या तर्फे श्रींची आरती. त्यानंतर संस्थांची आरती, नारळ प्रसाद व विधिवत मानपानाचा कार्यक्रम. माउलींचे मानाचे दोन्ही अश्‍व मंदिरात प्रवेश करतील. विणामंडपात पालखीमध्ये “श्रीं’च्या चल पादुका प्राणप्रतिष्ठापित होईल.

दरम्यान, संस्थांतर्फे मानकऱ्यांना मानाची पागोटी वाटप करण्यात येईल. नंतर पालखी महाद्वारातून प्रस्थान ठेऊन प्रदक्षिणा मार्गाने भराव रस्ता, भैरवनाथ महाराज चौक, हजेरी मारुती मंदिर, दिर चावडी चौक, महादेव चौकातून आजोळघरी (दर्शन मंडप इमारत गांधी वाडा) येथे पहिल्या मुक्‍कामासाठी स्थिरावेल. त्यानंतर “श्रीं’ची समाज आरती दर्शन मंडप इमारत गांधी वाडा येथे होईल. व रात्री 11 ते 4.30 जागर.

Leave A Reply

Your email address will not be published.