मांढरदेव येथे करवसुलीत लाखोचा घोटाळा

बनावट पावतीपुस्तकाद्वारे सुरु होती करवसुली
ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरही प्रशासनाकडून पाठराखण? 
मेणवली – गतवर्षी मांढरदेव यात्रा कालावधीत येथील काही कर्मचाऱ्यांनी कोणताही ठेका नसताना बनावट पावतीपुस्तके छापून सुमारे दोन लाखाचा बेहिशोबी कर वसुल केला आहे. ही बाब ग्रामस्थांनी सरपंच, उपसरपंच यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दरम्यान, या प्रकरणाची राज्याच्या पंचायत राज कमिटीकडेही तक्रार करण्यात आली असून संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मांढरदेव ग्रामस्थांनी दिला आहे.

मांढरदेव याठिकाणी यात्राकालावधीत देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून प्रतिव्यक्ती 2 रुपयांप्रमाणे कर वसुल केला जातो. त्यासाठी रितसर ठेका दिला जातो. मात्र, येथील काही कर्मचाऱ्यांनी कोणताही ठेका न घेता सातारा येथील एका प्रिंटिंग प्रेसमधून मोठ्या प्रमाणात बनावट पावती पुस्तके छापून कर वसुली करण्याचा गोरखधंदा केला आहे. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने घोटाळेबाजांची पाठराखण केली जात असल्याची चर्चाही आता परिसरात सुरु झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामपंचायतीकडून घोटाळेबाजांवर कारवाई होत नसल्याने आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी याबाबत गटविकास अधिकारी अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची लेखी तक्रार केली आहे. परंतु, त्यांच्याकडून आश्‍वासना देण्यापलिकडे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात असून लवकरात लवकर बनावट पावती पुस्तके छापून भाविकांची लुट करत स्वत:ची घरे भरणाऱ्यांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मांढरदेव ग्रामस्थांनी दिला आहे.

मुख्याधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
बनावट पावती पुस्तके छापून भाविकांची लुट करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा ग्रामस्थांमुळे उघडकीस आला आहे. याप्रकरणी ग्रामस्थांकडून वारंवार तक्रारी करुनही सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकार तसेच गटविकास अधिकाऱ्यांकडूनही कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी याप्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसेच या तक्रारीची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच पंचायत समितीलाही देण्यात आली आहे.

घोटाळेबाजांची पाठराखण?

बनावट पुस्तके बनवून भाविकांची लूट करत लाखो रुपयांची माया गोळा करणाऱ्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर वारंवार तक्रारी करुनही अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही. सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच गटविकास अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे भ्रष्ट अन्‌ लबाड कर्मचाऱ्यांची नेमकं कोण? आणि कशासाठी? पाठराखण करत आहे, असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकणार

मांढरदेव येथे यात्रा कालावधीत बनावट पावती पुस्तके छापून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थांनी पोलखोल केला आहे. याप्रकरणी वारंवार तक्रारी करुनही कोणतीच कारवाई होत नसल्याचे निदर्शनास येऊ लागल्याने संबंधितावर तात्काळ कारवाई न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)