मांजरी खुर्द येथील खूनप्रकरणी चौघे अटकेत

एक अल्पवयीन : लोणीकंद पोलिसांचे यश

वाघोली- वाघोली-मांजरी रस्त्यावरील घरात घुसून राजाराम साळुंके यांचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करणाऱ्या चार मारेकऱ्यांना पकडण्यात लोणीकंद पोलिसांना यश आले आहे. अत्यंत निर्घृणपणे खून करून पसार झालेल्या मारेकऱ्यांना पकडून पोलिसांनी मोठे आव्हान पेलले असून चौघांसोबत आणखी एक अल्पवयीन मारेकरी असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौघांना न्यायालयाने शुक्रवार (दि. 10) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अनिकेत राहुल गायकवाड (वय 20, रा. धायरी), अरविंद महादेव जाधव (वय 21, मोहम्मदवाडी, हडपसर), अभिलाष श्रीकांत मुळे (वय 25, रा. सोलापूर), मंगेश बाळू गवळी (वय 19, रा. धानोरी जकातनाका) असे अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजाराम साळुंके यांचा मांजरी-वाघोली रस्त्यालगतच्या राहत्या घरात पाच जणांनी निर्घृणपणे धारधार शस्त्राने वार करून खून केला होता. खून करून पाचजण दुचाकीवरून फरार झाले होते. लोणीकंद पोलिसांनी लागलीच तपासाची सूत्रे हलवून मुख्य मारेकरी अनिकेत गायकवाड याला अटक केली. त्यानंतर पोलिसांनी अरविंद जाधव, अभिलाष मुळे, मंगेश गवळी यांना अटक केली, त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारा अल्पवयीन मारेकऱ्याचा शोध पोलिसांनी घेतला आहे.

पैशांच्या कारणावरून खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत असले तरी मारेकऱ्यांच्या चौकशीत नेमके कोणत्या कारणामुळे साळुंके यांचा खून केला याचा ठोस उलगडा झाला नसून चौघांवर इतर ठिकाणी गुन्हे दाखल आहेत का? याचा शोध पोलीस घेत आहेत. खून करून फरार झालेल्या मारेकऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान लोणीकंद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने यशस्वीपणे पेलले आहे. पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, सुरेशकुमार राऊत यांच्यासह गुन्हे शोध पथकाने चौघांना पकडले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.