पुणे : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना एक महत्त्वपूर्ण योजना असून यामुळे महिलांचे आरोग्याबरोबरच वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचे रक्षण होईल. चुलीवर स्वयंपाक करताना तयार होणाऱ्या धुरामुळे महिलांना श्वसनाचे विकार होवू नयेत, यासाठी प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना उपयुक्त असून महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
प्रधानमंत्री उज्वला गॅस योजनेंतर्गत हवेली तालुक्यातील आंबी येथील 100 लाभार्थी महिलांना पालकमंत्री बापट यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार भीमराव तापकीर, आंबीच्या सरपंच पुष्पा निवंगुणे, उपसरपंच लक्ष्मण साळुंखे, श्रीराम गॅस एजन्सीचे उदय जोशी, मयुरेश जोशी आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, नागरिकांच्या विकासासाठी केंद्र सरकार व राज्य शासन विविध योजना राबवीत आहे. ग्रामस्थांनी शासकीय योजनांची सखोल माहिती घेऊन लोकसहभागातून गावाचा विकास साधणे आवश्यक आहे. आंबीच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनही निधीची तरतूद करण्यात येईल.
आमदार तापकिर म्हणाले, आंबी हे निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव आहे. या गावाबरोबरच या भागाच्या विकासासाठी विविध लोककल्याणकारी कामे हाती घेण्यात आली आहेत. गावकऱ्यांनीही शासकीय योजनांचा लाभ घेऊन गावाचा विकास साधावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायतीचे सदस्य जयवंत निवंगुणे यानी केले. यावेळी गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा