महिलांची पारनेर पोलिसांना बागड्यांची भेट

अवैध दारूविक्रीचा अनोखा निषेध; बंदी असतानाही पोलिसांचा आशीर्वाद
निघोज – महिलांच्या संघर्षानंतर निघोजला दारुबंदी झाली. तरीही पोलिसांच्या आशीर्वादाने निघोजमध्ये खुलेआम दारूविक्री सुरू आहे. अवैध दारूविक्री व वाळूतस्करीला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे यांना मात्र तडीपार करण्यात पोलीस धन्यता मानतात. दारूबंदी चळवळीच्या महिला कार्यकर्त्यांनी घावटे यांच्यावरील तडीपारीच्या प्रस्तावास विरोध करण्यासाठी रक्षाबंधनाचे औचित्य साधून राख्यांऐवजी बागड्यांचा नजराणा पोष्टाद्वारे भेट दिला. दारूबंदी चळवळीच्या महिलांनी अचानक घेतलेल्या या पवित्र्यामुळे निघोजमधील अवैध दारूविक्रीचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पोलीस आता अवैध दारूविक्री विरोधात काय भूमिका घेतात, याकडे निघोजकरांचे लक्ष लागले आहे. गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी निघोज येथील दारूबंदीचा ऐतिहासिक लढा महिलांनी जिंकला होता. त्यासाठी येथील महिलांनी “रास्ता रोको,’ सारखी आंदोलने केली. अतिशय संघर्षातून निघोजला दारूबंदी झाली असताना स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने गेल्या वर्षभरापासून खुलेआम दारूविक्री सुरू आहे. याबाबत पोलीस प्रशासनास अनेकवेळा सांगूनही अवैध दारूविक्री व अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.उलट निघोज व जवळा परिसरात दारूबंदीसाठी पुढाकार घेतलेल्या घावटे यांचा तडीपारीचा प्रस्ताव पारनेर पोलिसांनी तयार केला. त्यामुळे निघोज व परिसरातील दारूबंदी चळवळीतील महिला आता आक्रमक बनल्या आहेत. निघोजच्या दारूबंदीची जिल्हापातळीवर दखल घेतली गेली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या पुढाकाराने राज्याला नवीन दारुबंदी व ग्रामरक्षक दल कायदा मिळाला; परंतु त्याची अंमलबजावणी अधिकारी करत नाहीत. त्यामुळे कायदा होवूनही त्याचा उपयोग नाही, अशी भावना येथील महिलांनी व्यक्त केली.
अवैध दारूमुळे पांगरमलसारखे दारूहत्याकांड होऊनही उत्पादनशुल्क व पोलीस खात्याला त्याचे गांभीर्य नाही. पोलीस प्रशासन दारू विक्रेत्यांना पाठीशी घालते, असा आरोप महिलांनी केला आहे. दारूबंदीसाठी प्रयत्न करणाऱ्याला पोलीस तडीपार करू लागल्याच्या संतप्त भावना महिलांनी व्यक्त केल्या. या वेळी कांता लंके, शांताबाई भुकन, सनीशा घोगरे, पुष्पा वराळ, शालन इंगळे, भागुबाई शिंदे आदी महिला उपस्थित होत्या. घावटे यांच्यावरील तडीपारीची कारवाई अन्यायकारक आहे. ती पोलिसांनी मागे घ्यावी व निघोजमध्ये सुरू असलेली खुलेआम अवैध दारूविक्री बंद करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)