महाश्रमदानातून खोदले 250 समतल चर

वाशेरे गावात राबले एक हजार हात : डोंगर, सपाट माळरानात केले श्रमदान

राजगुरूनगर- महाराष्ट्रदिन व कामगार दिनाचे औचित्य साधून वाशेरे (ता. खेड) येथे ग्रामस्थ व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था, आकुर्डी यांच्या संयुक्‍त विद्यमाने महाश्रमदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सुमारे एक हजार नागरिक हाती घमेले, टिकाव व फावडे घेऊन उत्स्फूर्तपणे सहभागी होत वाशेरे गावाच्या डोंगर, सपाट माळरानात श्रमदानातून 250 सलग समतल चर खोदण्यात आले, अशी माहिती वाशेरे गावचे सरपंच संभाजी कुडेकर व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचे सचिव पी. एस. मुखर्जी यांनी दिली.

या उपक्रमात वाशेरेपरिसरातील कोहिंडे, साबुर्डी, वाजवणे, हेद्रज या गावांतील ग्रामस्थ सहभागी झाले होते. वाशेरेच्या परिसरातील वाहून जाणारे पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्यासाठी गावच्या परिसरात चर व शोषखड्ड्यांचे खोदकाम लोकसहभागातून करण्यात आले. या उपक्रमामध्ये ग्रामस्थ, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था व बजाज ऑटोचे पदाधिकारी, कर्मचारी सहभागी झाले.

दोन हजार मतदार संख्या असल्यामुळे राजकीय क्षेत्रातील महत्त्वाचे पण शाश्‍वत विकासापासून सतत वंचित राहिल्याने बाराही महिने पाणी टंचाई असणारे खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील गाव म्हणून वाशेरे गावची ओळख. शासकीय योजनेतून नळ पाणीपुरवठा योजना त्याच बरोबर जलयुक्‍त शिवारातून परिसरात अनेक कामे होऊनही दर वर्षी उन्हाळा सुरू झाला की पाण्याच्या टॅंकरची मागणी पाचवीला पुजलेली असते. गावठाणासह येथील पाटेवाडी, गणेशनगर, चिमटेवाडी, भारतेवाडी, भोतेवाडी, तरडेवाडी, चिंचेचाडोह या वस्त्यांना कायम पिण्याच्या पाण्याची टंचाई असते.यावर मात करण्यासाठी सरपंच संभाजी कुडेकर यांनी जानकीदेवी बजाज ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्याशी चर्चा करून हे लोकसहभागातून महाश्रमदान उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला त्यात बजाज कंपनीचे कामगार आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठा सहभाग घेतला.

वाशेरे येथे आयोजित महाश्रमदान अभियानात बजाज ऑटो लि, जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्था, अर्पण, बजाज एज्यूकेशन इनेसेटिव्ह, रॉबिनहूड आर्मी, मॅजिक बस व वाशेरे गावाच्या ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता. या श्रमदानामध्ये बजाज ऑटो लि.चे उपाध्यक्ष व्ही.रमेश यांनी सपत्नीक सहभाग घेतला. बजाज ऑटो सीएसआरचे महाप्रबंधक पंकज बल्लभ, जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरुण जोशी, संचालक (ग्रामीण) सुधीरकुमार पांडे, पी. एस. मुखर्जी , संस्थेचे मुख्य अभियंता अनिल भंडारे, मॅनेजर सतीश धामणे, सहायक व्यवस्थापक राजेश कारेकर, प्रमोद मेश्राम वाशेरे गावचे सरपंच संभाजी कुडेकर यांच्यासह वाशेरे व परिसरातील गावातील ग्रामस्थ, तरुण मंडळ, महिला मंडळ यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी राजेश उफाडे यांनी केले सरपंच संभाजी कुडेकर यांनी आभार मानले

  • वाशेरे गावातील पाणी प्रश्‍न सोडविणेसाठी गावातील प्रत्येक ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. एकजूटीतून मोठी क्रांती होते. ग्रामस्थांनी एकजूट ठेवून गावातील प्रश्‍न सोडवावेत. कंपनीच्या माध्यमातून पावसाळ्यात प्रत्येक कुटुंबाला एक रोप देण्याचे येणार असून त्या रोपाचे वर्षभर संगोपन करून येणाऱ्या वर्षात सीसीटी केलेल्या जागेवर लावावेत.
    – व्ही. रमेश, उपाधक्ष, बजाज ऑटो

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.