महावितरणमुळे नागरिकांचे बळी!

दुरुस्तीची कामे तातडीने करण्याची मागणी

नेवासे – महावितरण कंपनीने जिल्ह्यात करावयाची आवश्‍यक दुरुस्तीची कामे वेळेवर न केल्यामुळे निष्पाप नागरीकांचा नाहक बळी जात आहे. ही दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, अशी मागणी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य कारभारी गरड यांनी केली आहे.
नेवासे तालुक्‍यातील नजिकचिंचोली येथील सरिता ठोंबरे ही 32 वर्षे वयाची महिला 15 दिवसांपूर्वी शेतात तुटलेल्या तारेस चिकटून मरण पावली. श्रीगोंदे तालुक्‍यातील प्राथमिक शाळेत वीजप्रवाह असलेली तार सात-आठ दिवसांपूर्वी तुटली. तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रसंगावधान दाखविल्यामुळे दुर्घटना टळली. जामखेडमध्ये दोन दिवसांपूर्वी सई दत्तात्रय कराडकर ही पाच वर्षांची मुलगी वीज रोहित्राच्या तारेला चिकटून जखमी झाली. तारांच्या घर्षणाने उन्हाळ्यात उसाचे फड पेटणे, इतर ठिकाणी आग लागणे अशा घटना सर्रास घडतात. याप्रमाणे अनेक दुर्दैवी घटना जिल्ह्यात या पूर्वी घडलेल्या आहेत. विशेष म्हणजे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत नेवासे, शेवगाव, श्रीरामपूर, पाथर्डी, श्रीगोंदे या तालुक्‍यातील सदस्यांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे; परंतु महावितरणचे अधिकारी निधीची अडचण पुढे करतात. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत अशी कामे प्राधान्याने करण्याबाबत निर्णय झाला. तसेच प्रत्येक तालुक्‍यात तारांना असणारा झोळ व इतर धोकादायक कामांची माहिती संकलीत करण्याबाबत चर्चा झाली.
जिल्ह्यात महावितरणची कामे फार पूर्वी झाली आहेत, असे निदर्शनास आणून गरड म्हणाले, की आता तिथे दुरुस्तीची आवश्‍यकता आहे. काही महिन्यांपूर्वी केलेल्या कामातसुद्धा दोष निर्माण झाले आहेत. दोन खांबामधील तारांमध्ये झोळ पडणे, खांब झुकणे, खांबालगतची झाडे, वेली वाढणे, धोकादायक रोहित्राचे बॉक्‍स, शाळांच्या आवारातून जाणाऱ्या वीजवाहिन्या, खांबाचे अडथळे आदींमुळे यापूर्वी अनेकदा दुर्घटना घडलेल्या आहेत. झोळ पडलेल्या तारांमध्ये घर्षण होऊन ऊस, चारागंजी, राहते छप्पर जळणे, त्यात आर्थिक व प्राणहानी होणे, संसारोपयोगी साहित्य, धान्य आदी खाक होणे अशा दुर्घटना घडतात. त्यातून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वीच हा अतिशय महत्वाचा प्रश्न जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत उपस्थित करूनही केवळ निधीअभावी ही कामे करता येत नसल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात. गेल्या वर्षी शाळेच्या आवारातील खांब, रोहित्रे इतरत्र हलविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. असे असूनही या महत्वपूर्ण समस्येकडे दुर्लक्ष कशामुळे होते, असा सवाल गरड यांनी केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)