महावितरणचे 250 खांब जमीनदोस्त

बारामती- वादळी पावसामुळे बारामती व इंदापूर तालुक्‍यात विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही तालुक्‍यात वादळाने मोठमोठी झाडे पडल्यामुळे महावितरणचे सुमारे 250 वीजखांब जमीनदोस्त झाले. अनेक ठिकाणी तारा तुटल्या आहेत. सोमवारी रात्री उशिरापर्यंत बहुतेक भागांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.
वादळी पावसाने रविवारी (दि. 27) रात्री बारामती व इंदापूर तालुक्‍यास झोडपून काढले. ठिकठिकाणी मोठेमोठे वृक्ष उन्मळून पडले, झाडांच्या फांद्या तुटल्या. याचा फटका महावितरणच्या यंत्रणेला बसला आणि अनेक भागांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर लगेच महावितरणचे अभियंते, जनमित्र तसेच ठेकेदाराची 15 पथके वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या कामासाठी दोन्ही तालुक्‍यात एकाच वेळी रवाना झाली. रविवारी रात्रीच अनेक ठिकाणी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल झाल्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा आला. वीजखांबांवर कोसळलेली झाडे व फांद्या कापून बाजूला काढणे, त्यानंतर खांब उभारणे आणि शेवटी तारा ओढणे अशा टप्प्यात ही कामे केली जात आहेत. दोन्ही तालुक्‍यांत उर्वरित ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महावितरणचे जवळपास 250 जनमित्र व ठेकेदाराचे 120 कामगार वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम करत आहेत, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.
या आपत्तीत बारामती तालुक्‍यात 152 व इंदापूर तालुक्‍यात 103 खांब कोसळले. दोन्ही तालुक्‍यात 250हून अधिक ठिकाणी खांब वाकले आहेत. अनेक ठिकाणी तारा तुटल्या आहेत. महावितरणचे प्रथमदर्शनी 25 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. हा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, जोरदार वादळामुळे बारामती शहरातील खंडोबानगर, देसाई इस्टेट व गणेश मंदिर वाहिनीवर रविवारी रात्री साडेनऊ वाजता खंडीत झालेला विद्युतपुरवठा महावितरणच्या अभियंते व कर्मचारी यांनी केलेल्या अथक परिश्रमानंतर दीड तासांतच सुरळीत झाला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)