महाराष्ट्र बॅंकेच्या स्वाईप मशीनमध्ये गडबड गोंधळ

नीरा- एकीकडे डिजिटल, ऑनलाइन आर्थिक व्यवहारांना चालना देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू असताना राष्ट्रीयकृत बॅंकाच याबाबत ग्राहकांशी आडमुठ्या वागून सरकारी योजनांना हरताळ फासत आहेत. येथील महाराष्ट्र बॅंकेत तांत्रिक बिघाड झाल्याने दुरुस्ती करण्यासाठी दिलेले मशीन मिळविण्यासाठी येथील डॉक्‍टरांनाही हेलपाटे मारावे लागत असल्याने बॅंकेच्या कामाबाबत नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
येथील नीरा, गुळुंचे, कर्नलवाडी, पाडेगाव, सोमेश्वर परिसरातील हजारो नागरिक बॅंकेचे ग्राहक आहेत. सेवा पुरविताना बॅंकेकडून मनमानी कारभार होत असल्याच्या अनेक तक्रारी आत्तापर्यंत झाल्या आहेत. नीरेतील बालरोग तज्ज्ञ प्रसाद भट्टड यांना येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या नीरा शाखेतून स्वाईप मशीन देण्यात आले. अनेक व्यवहार झाले तरी खात्यावर रकमेत फारसा फरक पडत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी अशा व्यवहारावर लक्ष ठेवले असता त्यांच्या एका व्यवहारात संबंधिताच्या खात्यामधून रक्कम कट झाली. मात्र भट्टड यांच्या खात्यावर ती रक्कम आजपर्यंत वर्ग झाली नाही, हे लक्षात आले. त्यांनी याबाबत बॅंक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता प्रथम मशीन खराब झाले असेल, असे म्हणत मशीन जमा करून घेतले, त्यानंतर दोन महिने झाले तरी त्यांना मशीन देण्यात आले नाही. भट्टड यांनी मशीन नको माझी अनामत रक्कम परत करा, असे सांगितले. मात्र, त्यांची अनामत रक्कमही परत करण्यात आली नाही. डॉ. भट्टड यानी दोन महिन्यांपूर्वी मशीन जमा केले असले तरी आज (दि. 28) 950 रुपयांचा व्यवहार केल्याचा व जमा झाल्याचा संदेश भट्टड यांच्या मोबाइलवर आला आहे.
सरकारकडून ऑनलाइन व्यवहारांना चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार करण्यावर भर दिला जात आहे. नोटाबंदीनंतर अनेकांनी मोदींच्या धोरणाला पाठिंबा देत ऑनलाइन व्यवहार करण्यावर भर दिला. अनेक दुकानदारांनी, व्यावसायिकांनी बॅंकेकडून स्वाइप मशीन घेतले. मात्र, ऑनलाइन व्यवहारात अनेकदा त्रुटी झाल्या. पेट्रोल पंपांवरही अशीच परिस्थिती अनेकदा झाली आहे. व्यवहार न होताच ग्राहकांच्या खात्यावरील पैसे गेल्याचे मेसेज ग्राहकांना आले. ही वजा झालेली रक्कम काही महिन्यांनी त्यांच्या मूळ खात्यात जमा झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
व्यावसायिकतेला चालना देण्यासाठी सुरू केलेल्या मुद्रा योजनेचा लाभ पुरेशा प्रमाणात दिला जात नाही. शिशु तसेच मध्यम कर्ज काढण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. शिष्यवृत्ती कर्ज मिळविण्यासाठी कागदपत्रांचा फार्स विद्यार्थ्यांवर आवळला जात आहे. त्यातच बॅंक कर्मचारी आणि अधिकारी ग्राहकांना दमदाटी करत उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. बॅंकेकडून नागरिकांना नाहक त्रास झाल्यास बॅंकेपुढे उपोषणाला बसण्याचा इशारा काही ग्राहकांनी दिला आहे.

  • ग्राहक लेखी तक्रार करीत नाहीत, तोंडी तक्रारीला आमच्या लेखी कोणतीही किंमत नसते. डॉ. भट्टड यांच्याबाबत असे काही घडले नाही. त्यांनी आमच्याकडे कोणतीही तक्रार केली नाही.
    – निशांत वैद्य, प्रभारी शाखा अधिकारी
  • गेल्या दोन महिन्यांपूर्वी माझ्याकडील स्वाईप मशीन बॅंकेने दुरुस्तीच्या नावाखाली ताब्यात घेतले आहे. बॅंकेकडून दुसरे मशीन दिले जात नसून माझे डिपाझिटही मला दिले जात नाही. विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत, तसेच माझ्या व्यवहाराचे पैसेही माझ्या खात्यावर जमा केले जात नाहीत. अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे.
    -डॉ. प्रसाद भट्टड, बालरोग तज्ज्ञ, नीरा.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)