महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवा- यशवंत भोसले

पिंपरी – महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ तातडीने बंद करण्याचे भांडवलदारांचे षडयंत्र सुरू आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ व बांधकाम कामगार कल्याण या दोन्ही मंडळाचे स्वतंत्र अस्तित्व बंद करु नये. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अस्तित्व स्वतंत्र आहे. ते बांधकाम कल्याण मंडळात समाविष्ट करु नये अशी मागणी करणारा ठराव राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पिंपरी येथे झालेल्या गुणवंत कामगार परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत मांडला. पिंपरीतील संत तुकारामनगर येथील संत तुकाराम प्रतिष्ठान येथे गुणवंत कामगार परिषदेच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते.

यावेळी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या माजी संचालिका भारती चव्हाण, शिवाजीराव शिर्के, रामकृष्ण राणे, राजेश हजारे, सुनील अधाटे, श्रीकांत जोगदंड, स्वानंद राजपाठक, सतीश देशमुख, अनिल पालकर, बशीर मुलानी, भरत शिंदे, संजय गोळे, गोरख वाघमारे, पंकज पाटील, प्रकाश घोरपडे, तानाजी एकोडे, कल्पना भाईगडे, आश्‍फिया सय्यद, लक्ष्मण इंगवले आदी उपस्थित होते. यशवंत भोसले म्हणाले, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा समावेश बांधकाम कल्याण कामगार मंडळात करु नये, याला राज्यस्तरीय बैठकीत विरोध करण्यात आला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगारांना एसटीमध्ये पती-पत्नीस मोफत पास, रेल्वे पास सवलत, टोलमाफी, गुणवंत कामगारांमधून आमदार निवडला जावा, कामगारांना स्मार्टकार्ड, औषधोपचार, सेवानिवृत्त गुणवंत कामगाराला दहा हजार रुपये मानधन, म्हाडामध्ये घरे, गुणवंत कामगाराला स्विकृत नगरसेवक आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ बंद केले तर उद्याचा कामगारही जन्माला येणार नाही. गुणवंत पुरस्कारही संपुष्टात येतील. त्यामुळे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ स्वतंत्र ठेवावे, ते बांधकाम कायद्यात समाविष्ट करु नये, असा ठराव यावेळी करण्यात आला व त्याला सर्व गुणवंत कामगारांनी अनुमती दर्शविली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वानंद राजपाठक यांनी केले. सूत्रसंचालन राज अहिरराव यांनी केले. आभार अनिल पालकर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.