महाराष्ट्र एटीएसचे पथक दिल्लीत ; संशयित दहशतवादी जान महंमद शेखची करणार चौकशी

मुंबई – महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक दिल्लीत दाखल झाले असून संशयित दहशतवादी जान महंमद शेख याची चौकशी करणार आहे. जान महंमद याच्यावर आयएसआय एजंटच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. जान महंमद हा मुंबईतील धारावी येथे राहणारा असून त्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन दिवसांपूर्वी राजस्थानच्या कोटा येथून अटक केली होती.

जान हा दाऊद गॅंगसाठी काम करत असल्याची माहिती असल्यामुळे दिल्ली पोलिसांच्या परवानगीनंतर महाराष्ट्र एटीएसचे अधिकारी त्याची चौकशी करणार आहेत. जान महंमद शेख हा टॅक्‍सी चालक असून सायन पश्‍चिमेकडील एमजी रोडवर असणाऱ्या कालाबखर झोपडपट्टी भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला पत्नी आणि दोन मुलीही आहेत. त्यापैकी एका मुलीने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे, तर दुसरी मुलगी शाळेत शिकते.

महाराष्ट्र एटीएसतर्फे देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे जान महंमद शेख एटीएसच्या रडारवर होता. त्याला मुंबईत अनेक वर्ष टॅक्‍सी चालवण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्याला मुंबईच्या रस्त्यांची खडा न्‌ खडा माहिती आहे. त्याच्यावर मुंबईत घातपात घडवून आणण्याची जबाबदारी सोपवण्यात येणार होती, अशी माहिती मिळत आहे.

जान महंमद हा 13 सप्टेंबर रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरुन दिल्लीला रवाना झाला होता. जान महंमदचा अनेक वर्षांपूर्वीपासूनच दाऊद गॅंगसोबत संबंध होता. जवळपास 20 वर्षांपूर्वी जान महंमदवर मुंबईच्या पायधुनी पोलीस ठाण्यात गोळीबार, तोडफोड, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.