महाराष्ट्रात होणार ‘आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव’- मुख्यमंत्री

33 व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली: रामायण महाकाव्याने जगाला मूल्य व नवी दिशा दिली. हाच विचार जगभर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्रात ‘आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचे’आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘सुरजकुंड आंतरराष्ट्रीय मेळ्यात’ केली. या महोत्सवासाठी त्यांनी देश -विदेशातील पर्यटकांना निमंत्रणही दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हरियाणातील फरीदाबाद येथे आयोजित 33 व्या सुरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळ्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ही घोषणा केली. याप्रसंगी महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल, हरियाणाचे पर्यटनमंत्री रामबिलास शर्मा , भारतातील थायलंडचे राजदूत चुटिन्ट्रोन गोंगस्कडी यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, ‘रामायण’ हे महाकाव्य जगातील सर्वच लोकांना मार्गदर्शक आहे. वेग-वेगळ्या देशातही रामायणाचे सादरीकरण होते. मुख्यत: फिलिपिन , कंबोडिया, थायलंड या देशातील कलाकारांनी त्यांच्या देशात सादर होणारे ‘रामायण’ या महोत्सवात सादर करावे तसेच भारतातील रामायणाचे सादरीकरण जगभर पोहोचावे या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण व्हावी हा या महोत्सवाचा उद्देश आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 25 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीत  मुंबई येथे हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, हरियाणा आणि महाराष्ट्र यांचे नाते अतूट असून हे ‘माती व रक्ताचे’ नाते आहे. हरियाणाच्या मातीत महाराष्ट्रातील सैन्याने देश रक्षणासाठी पानिपत युद्धात आपले रक्त सांडले. हा गौरवपूर्ण इतिहास जगापुढे घेऊन जाण्यासाठी हरियाणा सरकारने पुढाकार घेतला आहे. हरियाणा सरकारने पानिपत युद्ध स्मारक विकासासाठी सुरु केलेल्या कार्याला महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

पर्यटन हा संपूर्ण देशाला एका सूत्रात जोडणारा धागा असून उत्पन्नाचेही उत्तम साधन आहे. सुरजकुंड मेळ्याच्या माध्यमातून देशातील हस्तकलाकारांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होते. हा मेळा देश-विदेशातील पर्यटकांचेही मोठे आकर्षण आहे. या मेळ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांनी पानिपत येथील युद्ध स्मारकालाही भेट द्यावी अशा भावना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केल्या. या मेळ्यात महाराष्ट्राला थीम स्टेटचा मान दिल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. तसेच या मेळ्यात सहभागी झालेल्या देश-विदेशातील सर्व कलाकारांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

आज सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प देशातील गरीब, सामान्य माणूस,शेतकरी, मध्यमवर्गीय व महिलांसाठी मोठी भेट असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)