महामार्गासह सेवारस्त्यांची दयनीय अवस्था

खड्डे अन्‌ साईडपट्ट्या खचल्याने वाहन चालविणे बेततयं जिवावर
मयूर सोनावणे
सातारा, – दोन-तीन वर्षांपासून सुरु असलेले सहा पदरीकरणाचे काम आणि गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे महामार्गासह सेवा रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. खड्ड्यांमुळे महामार्गावरुनही वाहने चालविणे जिकीरीचे झाले आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने सोईस्करपणे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांमधून संतापाची लाट उसळली आहे.
जिल्ह्यात महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम युद्धपातळीवरुन सुरु असून मोठ्या प्रमाणात हे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र हे काम करत असताना महामार्गावर अनेकठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. अगदी अशीच अवस्था नव्याने बांधण्यात आलेल्या सेवा रस्त्यांचीही झाली आहे. मात्र, याकडे प्रशासन लक्ष देईल तर नवल. काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांना मिळालेल्या डांबरीकरणाच्या झळाळीमुळे वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, ते फार काळ टिकले नाही. काही दिवसांतच या रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली तर काही ठिकाणी रस्तेदेखील खचले. खचलेले रस्ते तसेच खड्डे भरुन रस्त्याची दुरुस्ती होईल, अशी अपेक्षा वाहनधारकांसह प्रवाशांना होती. मात्र तसे काहीच घडले नाही. उलट या रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य वाढतच गेले. त्यामुळे सध्याची या रस्त्याची अवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय अशी झाली आहे.
ठेकेदारांवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महामार्गावरील अपघात ही नित्याची बाब झाली आहे. या अपघातांमध्ये अनेकांची बळी जात आहेत. मात्र तरीही या रस्त्यांच्या दुरुस्तीवर ना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आवाज काढत आहेत, ना प्रशासनाकडून कोणते ठोस पाऊल उचलले जात आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे करणाऱ्या संबंधित ठेकेदारांसह अधिकाऱ्यांवरही मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विविध सामाजिक संघाटनांसह वाहनधारक तसेच नागरिकांमधून होत आहे.
सेवारस्त्यांचीही दुर्दशा
सहापदरी करणाच्या कामावेळी बांधण्यात आलेल्या सेवा रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. विशेषत: साताऱ्यापासून वेळेपर्यंतच्या सेवा रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत तर अनेक ठिकाणी हे रस्ते खचले आहेत. मात्र, याकडे प्रशासनासह बांधकाम विभागानेही दुर्लक्ष केल्याने सेवारस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाले आहे.
अपघातांचे प्रमाणही वाढले
नव्याने बांधलेल्या महामार्गावर सध्या अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात या महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकजणांना कायमचे अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)