महाबळेश्‍वरात थंडीने स्ट्रॉबेरी शेतीचे प्रचंड नुकसान

महाबळेश्‍वर, दि. 10 (प्रतिनिधी) – शुक्रवार आणि शनिवारी महबळेश्‍वरमध्ये थंडीने अक्षरश: कहर केला. या दोन दिवशी महाबळेश्‍वरातील तापमान उणे 2 इतके होते. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमी तापमान या दोन दिवसांत नोंदविले गेले. थंडाच्या कडाक्‍याचा पर्यटकांनी मनमुरात आनंद लुटला असला तरी याच थंडीमुळे महाबळेश्‍वरसह परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषत: स्ट्रॉबेरी शेतीचे थंडीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने स्टॉबेरी उत्पादक शेतकरी चांगलेच आर्थिक संकटात सापडले आहेत.
शुक्रवार आणि शनिवारी महाबळेश्वर परिसरात अचानक थंडीचा जोर वाढला आणि या थंडीने विक्रमच केला. येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरातील निच्चांकी तापमान 0 ते उणे 2 पर्यंत गेले होते. यामुळे याच परिसरातील स्टॉबेरी उत्पादकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कडाक्‍याच्या थंडीने हजारो किलो स्टोबेरीची फळे फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली. हीच परिस्थिती पाले भाज्या व फुल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची असून सर्व रोपे प्रचंड थंडीने जळल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान तालुक्‍यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
निसर्गाच्या या लहरी पणामुळे सध्या या भागातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कालच्या थडीच्या कडाक्‍यानंतर आज शेतकरी स्ट्रॉबेरीची फळे तोडण्यासाठी आपल्या मळ्यात गेले तेव्हा तेथील फळांची गंभीर परिस्थिती पाहून अनेकांना आपले आश्रू आवरता आले नाहीत. प्रचंड मेहनत करून, रात्रंदिवस पहारा ठेवून गव्यापासून रक्षण केलेल्या स्ट्रॉबेरीचे कालच्या थंडीमुळे फळे फेकण्याची वेळ आली.

Leave A Reply

Your email address will not be published.