महापौर पदासाठी चिंचवडला संधी ?

पिंपरी – अशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असा नावलौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदावर अनेक इच्छुकांनी दावा केला आहे. हे सर्व जण एवढ्यावरच थांबले नसून, आपली राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून राजकीय पाठबळ मिळविण्यासाठी आता त्यांनी थेट “वर्षा’ वर धाव घेतली आहे. त्यामुळे महापौरपद भोसरीकडे जाण्याच्या चर्चेचा सुर आता पालटला असून तो चिंचवडच्या दिशेने वाहू लागला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने यश मिळविल्यानंतर चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील समर्थकांमध्ये सत्तास्थाने विभागली गेली. त्यानुसार स्थायी समिती अध्यक्षपद आमदार लक्षमण जगताप यांच्या गटाकडे तर महापौरपद आमदार महेश लांडगे यांच्याकडे देण्याचा राजकीय समझोता झाला आहे. त्यानुसार पहिले वर्ष सर्वकाही सुरळीत चालले होते. मात्र, वर्षभरानंतर स्थायी समितीवर लांडगे गटाने केलेला दावा मोडीत काढत, आमदार जगताप यांनी राजकीय डावपेच खेळत, ममता गायकवाड यांची यापदी वर्णी लावली. त्यामुळे चिडलेले महापौर नितीन काळजे आणि स्थायी अध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार राहूल जाधव यांनी पक्षाकडे आपल्या पदांचे तडकाफडकी राजीनामे दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना, ओबीसीकरिता राखीव असलेल्या महापौरपदाची संधी देण्याच्या आश्‍वासनानंतर राहूल जाधव यांनी शांत राहणे पसंत केले. आता महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिल्यानंतर स्थायी अध्यक्षपदासाठी डावललेल्या राहूल जाधव यांनी महापौरपदासाठी दावा केला आहे. मात्र, आता आमदार जगताप यांचे समर्थक शत्रुघ्न काटे यांची देखील राजकीय महत्वाकांक्षा उफाळून आली आहे. त्यांनी आपला दबाव तयार करण्यासाठी जगताप गटाच्या समर्थक नगरसेवकांसह थेट “वर्षा’ वर धाव घेतली आहे. दरम्यान, राहूल जाधव यांना महापौरपदी संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्‍चित समजले जात असतानाच, अन्य दावेदार शत्रुघ्न काटे यांच्या राजकीय हालचालींची माहिती समजल्यानेच आमदार लांडगे गटाच्या शिफारशीनुसार माळी समाजातील पुढाऱ्यांनी शनिवारी (दि. 28) तातडीची पत्रकार परिषद आयोजित करत, महापौरपद माळी समाजाला देण्याची मागणी केली आहे. तसेच महापौरपदासाठी माळी समाजाचा विचार न झाल्यास भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील, असा गर्भित इशारा दिला आहे. हा इशारा देत असतानाच, कुणबी समाजाला महापौरपद दिल्याबद्दल संतापही व्यक्त केला होता, हे विशेष.

दरम्यान, जगताप गटाचे शत्रुघ्न काटे यांची जबरदस्त राजकीय महत्त्वाकांक्षा असून, त्यांच्या कुणबी समाजाच्या जातपडताळणी प्रमाणपत्रावर विरोधकांनी हरकत घेतली आहे. काही दिवसांत या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित आहे. नुकतेच पायउतार झालेले महापौर नितीन काळजे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर देखील विरोधकांनी घेतलेल्या हरकतीमुळे ते अडचणीत सापडले होते. याच धर्तीवर महापौर पदासाठी तीव्र इच्छूक असलेले शत्रुघ्न काटे यांना या सर्व अडचणींमधून आपण सहीसलामतपणे बाहेर पडू, असा प्रचंड आत्मविश्‍वास असल्यानेच त्यांनी थेट “वर्षा’ वर धडक मारली आहे.

माळी समाजाचे अनेक प्रश्‍न प्रलंबित असून, ते मार्गी लावण्यासाठी महापौरपद माळी समाजाला देण्याची माळी समाजाची आग्रही मागणी आहे. मात्र, शत्रुघ्न काटे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा त्याला अडसर ठरत आहे. येत्या मंगळवारी (दि. 31) महापौर पदाचे नाव जाहीर केले जाणार असल्याने, या सर्व वेगवान राजकीय घडामोडींमागील राजकीय डावपेचांमध्ये कोण सरस ठरणार हे स्पष्ट होणार आहे.

दोन्ही आमदार महापौर पदासाठी आग्रही
लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्याकरिता आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे हे दोन्ही अनुक्रमे मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघातून इच्छुक आहेत. युतीच्या भवितव्यावर उमेदवारी अवलंबून असल्याने या दोघांनीही आपली इच्छा जाहीर केली नसली तरी त्यांच्या सावध हलचाली सुरु आहेत. महापौरपद मिळालेल्या मतदार संघात तुलनेत राजकीय वजन वाढलेले असते. याचा फायदा लोकसभा निवडणुकीत होण्यासाठी महापौरपद आपल्या मतदार संघात असावे, अशी दोन्ही आमदारांची इच्छा आहे. त्यादृष्टीने त्यांचे डावपेच सुरू आहेत. पक्षश्रेष्ठींकडून नेमका कोणाला “ग्रीन सिग्नल’ मिळतो, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)