महापौर निवडीची “खेळी’; अन्‌ पेटून उठला “माळी’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौरपदासाठी मूळ “ओबीसी’ समाजातील नगरसेवकांना डावलले जाणार, अशा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शहरातील माळी समाज पेटून उठला असून, महापौरपदाच्या निवडीत आता सत्ताधारी भाजपला कोणतीही “खेळी’ करु द्यायची नाही, असा निर्धार समाज बांधवांनी केला आहे.

महापालिकेतील भाजपच्या सत्तेतील पद वाटपाचा निर्णय शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप आणि सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने घेतला जातो. यावेळी भोसरी किंवा चिंचवड मतदार संघातील नगरसेवकाला महापौरपदी संधी देण्याचे निश्‍चित केले आहे. मात्र, “ओबीसी’साठी राखीव असलेल्या जागेवर पुन्हा कुणबी जात प्रमाणपत्र काढलेल्या उमेदवाराला संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. यापूर्वीही भाजप पक्षश्रेष्ठींनी कुणबी जात प्रमाणपत्र असलेल्या नितीन काळजे यांना महापौरपदी संधी दिली होती. त्यावेळी माळी समाजातून नाराजी व्यक्‍त करण्यात येत होती. आता काळजे यांनी राजीनामा दिला असल्यामुळे नवीन महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे यावेळी तरी माळी समाजातील उमेदवाराला महापौरपदी संधी मिळावी, यासाठी शहरातील माळी समाजाचे प्रमुख कार्यकर्ते एकवटले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विशेष म्हणजे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात महापौर पदासाठी अनिता फरांदे आणि डॉ. वैशाली घोडेकर या महिला सदस्यांना तत्त्कालीन सत्ताधाऱ्यांनी संधी दिली. पण, सत्ता परिवर्तन झाल्यानंतर “सब का साथ…सबका विकास’ असा नारा देणाऱ्या भाजपने माळी समाजाला डावलून कुणबी-ओबीसी उमेदवाराला संधी दिली.
सध्यस्थितीला आमदार जगताप समर्थक शत्रुघ्न काटे, शितल शिंदे, नामदेव ढाके यांच्यासह आमदार लांडगे समर्थक राहुल जाधव, संतोष लोंढे, वसंत बोऱ्हाटे आदी सदस्यांची नावे चर्चेत आहेत. दरम्यान, कुणबी-ओबीसी उमेदवाराला पुन्हा संधी मिळण्याची कुणकुण लागताच माळी समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एल्गार केला असून, भाजप पक्ष श्रेष्ठींकडे गाऱ्हाणे मांडले आहे. सत्ताधारी भाजपच्या यशात माळी समाजाचा मोठा वाटा आहे, असा दावाही कार्यकर्त्यांनी केला आहे.

अभी नही तो कभी नही…
शहरातील दर्शिले, भुजबळ, गायकवाड, भूमकर, जांबुळकर, कुदळे, म्हेत्रे, जाधव, लोंढे, बुर्डे, बोराटे, आल्हाट, बनकर, ताम्हाणे, ताजणे, खेडकर, सायकर, रासकर, हिंगणे, लोखंडे, दरवडे आदी आडनाव असलेल्या स्थानिकांचा “ओबीसी’ प्रवर्गात समावेश आहे. असे असतानाही भाजपकडून कुणबी-ओबीसी उमेदवाराला प्राधान्य दिले गेले. त्यामुळे “अभी नही तो कभी नही’ असे म्हणत आगामी महापौरपदावर माळी समाजाने दावा केला आहे. शहरात सुमारे दीड ते दोन लाख लोकसंख्या असलेल्या या समाजाला सत्ताधारी नेते न्याय देणार का? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)