महापौर, उपमहापौरानंतर पक्षनेत्यांची खांदेपालट

पिंपरी – पिंपरी-चिंचवडचे महापौर आणि उपमहापौरांनी आपल्या पदाचा राजीनामा नुकताच दिला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापायला सुरूवात झाली आहे. मात्र, सभागृह नेते पदाची मुदतदेखील आता संपली आहे. त्यामुळे महापौर, उपमहापौर बदलानंतर सभागृह नेते केव्हा बदलणार याची महापालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहर दौऱ्यानंतर वेगवान राजकीय घडामोडी घडल्या. सत्ता समीकरणात ठरलेल्या सव्वा वर्षांच्या मुदतीनंतर केवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेतील महापौर आणि उपमहापौर हे दोन्ही पदाधिकारी बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तत्पुर्वी स्थायी समितीमधील बदल जगताप गटाच्या पथ्यावर पडले. मात्र, पिंरी-चिंचवडबरोबरच पुण्याचे महापौर आणि उपमहापौर बदलाची शक्‍यता वतविली जात असताना, तसे न घडल्याने भाजपच्या गटातुनच नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सर्व महापालिका पदाधिकारी बदलाचे संकेत असताना, केवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेती बदलाने राजकीय विश्‍लेषकांच्यादेखील भुवया उंचावल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता मिळविल्यानंतर महापौरपदी आमदार महेश लांडगे समर्थक नितीन काळजे तर भाजपच्याच शैलजा मोरे यांना उपमहापौरपदी संधी मिळाली. मात्र, यावेळी भाजपचेच प्रबळ दावेदार नामदेव ढाके यांना ऐनवेळी वगळण्यात आल्याने भाजपतील एक गट नाराज होता. दरम्यान, सत्तेमध्ये समतोल साधत, सभागृहाचे कामकाज योग्यप्रकारे होण्यासाठी जुने जाणते एकनाथ पवार यांच्याकडे सभागृह नेत्याची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र, राष्ट्रवादीच्या काळात सभा तहकुबीवरुन टीका करणाऱ्या भाजपनेच सभा तहकुबीचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यावरून सभागृह नेत्याची सभागृह चालविण्याची क्षमता दिसून आली. महासभा आणि स्थायीच्या वारंवार होणाऱ्या सभा तहकुबीमुळे भाजपवर विरोधकांनी टीकेची झोड उठविली होती

दरम्यान, बोपखेलकरांच्या रस्ता प्रकरणाच्या निमित्ताने सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत, पदाला मुदतवाढ मागितल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या शहर दौऱ्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींनंतर महापौर व उपमहापौर बदलानंतर सभागृह नेत्याला मुदतवाढ मिळाली की काय? असा प्रश्‍न भाजपच्याच पदाधिकाऱ्यांना पडला आहे. तर महापौर आणि उपमहापौरांची नव्याने निवड झाल्यानंतर सभागृह नेतेपदी देखील बदल पहायला मिळणार असल्याची भाजपच्या गोटातच जोरदार चर्चा आहे. त्यामुळे या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर सभागृह नेते बदलाचे वारे वाहू लागले आहे.

मी इच्छूक नव्हेच!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहर दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी पदाचे राजीनामे दिले. त्यानंतर इच्छुकांच्या उत्साहाला उधाण आले होते. मी स्वत: इच्छूक असल्याचे मोठ्या ऐटीत सांगणाऱ्या या इच्छूकांची हवा काढून घेतल्याने अनेकजण इच्छा असूनही या पदाकरिता मी इच्छूक नसल्याचे आवर्जून सांगत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)