महापौरांचा “सर्जिकल स्ट्राईक’ आमदारांच्या जिव्हारी

तुषार रंधवे

पिंपरी – महापौर नितीन काळजे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या “कार्यक्षेत्रा’तील वाकडमध्ये विविध विकास कामांच्या भूमिपुजनानिमित्त केलेला “सर्जिकल स्ट्राईक’ आमदारांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या कार्यक्रमाला डावलल्यामुळे महापौरांबरोबरच अधिकाऱ्यांना आमदारांनी हस्ते, परहस्ते खडे बोल सुनावले आहेत. यामुळे स्वपक्षीयांबरोबरच महापालिका अधिकाऱ्यांवरील आमदारांच्या “रिमोट कंट्रोल’ ची चांगलीच चर्चा रंगली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांचे वर्चस्व आहे. महापौर स्थायी समिती सभापती निवडीवरुन या दोन्ही गटांचे संबंध कमालीचे ताणले गेले होते. एखाद्या कार्यक्रमानिमित्त हे दोन्ही आमदार आमने-सामने आल्यास आमही त्या गावचे नाहीतच अशा अविर्भावात एकमेकांशी संवाद साधतात. मात्र, आप-आपल्या समर्थकांना बळ देऊन, महापालिकेत वर्चस्व राखण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. याचाच एक भाग म्हणून एकमेकांच्या कार्यक्षेत्रातील उद्‌घाटनांना उपस्थिती लावणे प्रकर्षाने टाळतात.

दरम्यान, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या प्रभागातील विकास कामांचे भूमिपूजन या सर्व झापा-झापीला कारणीभूत ठरले. या भूमिपूजनाची पुर्वकल्पना आमदार जगताप यांना न देण्यामुळे महापौरांसह “खप्पा मर्जी’ झालेले महापालिका अधिकारी देखील त्यांच्या रडारवर आले. सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसह महापौर देखील आमदारांच्या दांडपट्टयाच्या कक्षेत आले. आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. मात्र, एका कार्यक्रमात महापौरांना देखील त्यांनी खडे बोल सुनावले.

दरम्यान, किमान आपआपल्या कार्यक्षेत्रातील विकास कामांमध्ये ढवळाढवळ न करण्याची खबरदारी हे दोन्ही आमदार घेतात. मात्र, त्यांच्या समर्थकांकडून होणाऱ्या शुल्लक चुका त्यांची स्वत:चीच कानउघाडणी करुन घेण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यातच शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी महासभेत शहरातील अनधिकृत बांधकामांविषयी प्रश्‍न विचारले होते. या सर्व प्रश्‍नांच्या उत्तरांमुळे भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेत, कलाटे यांनी थेट आमदार जगताप यांच्यावर शरसंधान साधत अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कलाटे यांच्यावर अगोदरच चिडून असलेल्या वाकडमधील विकास कामांचे भूमिपूजन यामुळे यात भर पडल्याचे चिडलेल्या जगताप यांनी स्वपक्षीय महापौर व अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)