महापूर ओसरल्यानंतर आता राजकीय धुळवड

पूर्व हवेलीतील राजकीय हवा गरम होणार

लोणी काळभोर- गेले काही दिवस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आघाडीवर बरीच लगबग, मोर्चेबांधणी सुरू होती. मात्र सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महापूरामुळे राजकारण शांत होऊन पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली होती. आता महापूरही ओसरला असून पूरग्रस्तांना मदत देण्याचे कामही जवळ जवळ संपले आहे. त्यामुळे पुन्हा हवेली तालुक्‍यात राजकीय धुळवड सुरु होणार आहे.

येत्या दीड महिन्यांत विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापल्या परीने निवडणुकीची तयारी सुरू केली होती. निवडणुकीत निवडून येण्याच्या दृष्टीने आवश्‍यक प्रत्येक छोट्या मोठ्या घटकांकडे जाऊन नाराजी काढण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. काही स्वपक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी हे दूर जाऊन आपल्याला फटका बसू नये म्हणून इच्छुक उमेदवारांची पळापळ सुरु आहे. इतर वेगवेगळ्या मार्गांनी निवडणुकीची तयारी सुरू झाली होती. मात्र सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड मोठा महापूर आला. त्यामुळे राजकीय आघाडीवर सर्वत्र शांतता पसरली होती. सर्वांनी आपापल्या पूरग्रस्त बांधवांना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू देऊन मदत केली. आता या तीनही जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

राज्य सरकार व स्वयंसेवी संस्था त्या परिसरात थांबून वेगवेगळ्या प्रकारे अजूनही मदत करीत आहेत. हे तीन जिल्हे सोडून इतर जिल्ह्यातील राजकारणी मंडळी मात्र आपापल्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहेत. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील इच्छुकही आता निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने नियोजन करून निवडणुक लढवण्याचे डावपेच सुरू झाले आहेत. या डावपेचांमध्ये साम, दाम, दंड, भेद हे चारही प्रकार वापरून समोरच्याला नामोहरम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जशी जशी निवडणूक जवळ येईल तशी हवेली तालुक्‍यातील धुळवड रंगणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×