महापालिकेत सल्लागारांना “अच्छे दिन’

सत्ताधारी भाजपचा कारभार : स्मशानभूमीलाही लागतो “सल्ला’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने प्रत्येक विकास कामांमध्ये सल्लागार नेमणुकीचा सपाटा लावला आहे. अनावश्‍यक सल्लागार पद्धतीवर वारेमाप खर्च होतोय, असा आरोप होत असतानाही पुन्हा चऱ्होली येथील स्मशानभूमीच्या कामाला सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापालिका सल्लागारांवर चालवली जातेय का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या ई-क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य विभागाने नगरसचिव विभागाकडे प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावाद्वारे प्रभाग क्रमांक 3 चऱ्होली येथील स्मशानभूमी विकसित करण्यासाठी (टप्पा-2) या कामास सल्लागार नेमणुकीची मागणी केली आहे. महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार नेमणुकीबाबतच्या समितीची बैठक दि. 4 जून 2018 रोजी शहर अभियंता यांच्याकडे झाली होती. या बैठकीमध्ये मे.शिल्पी आर्किटेक्‍टस्‌ ऍण्ड प्लॅनर्स या संस्थेद्वारे सादरीकरण करण्यात आले. या संस्थेद्वारे स्मशानभूमीच्या कामाचे पूर्वगणक पत्र तयार करणे व निविदा बनवणे तसेच, कामांवर देखरेख करणे इत्यादी निविदापूर्व व निविदा पश्‍चात इत्यादी कामे करुन घेण्यात येणार आहेत. मात्र, ही कामे सल्लागार संस्थेकडूनच करुन घ्यावयाची असतील, तर महापालिकेचा स्थापत्य आणि संबंधित विभाग काय काम करणार? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

विशेष म्हणजे, अतिरिक्‍त आयुक्‍तांच्या स्वाक्षरीने नगर सचिव विभागाकडे स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवलेल्या प्रस्तावात संबंधित सल्लागार संस्थेने यापूर्वीही महापालिकेतील विविध विकासकामांमध्ये सल्लागार म्हणून काम पाहिले आहे, असा उल्लेख आहे. तसेच, संबंधित संस्थेला रस्ते महामार्ग प्रकल्पाचे सविस्तर प्रकल्प तयार करण्याचे अनुभव असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे रस्ते महामार्गाचे प्रकल्प तयार करणाऱ्या संस्थेला स्मशानभूमीच्या विकास कामाचे सल्लागार म्हणून नेमण्यात प्रशासनाचा “रस’का? असाही सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने निविदा पूर्व व निविदा पश्‍चात कामासाठी प्रकल्प व्यवस्थान सल्लागार म्हणून वेगळ्या संस्थेची नेमणूक करुन प्रचलित दरानुसार फी अदा करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. याबाबत सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी अभ्यास करुन योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

सल्लागारांची गरजच काय?
दरम्यान, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते दत्ता साने यांनी प्रशासनाच्या वारेमाप सल्लागार नेमणुकीवर आक्षेप घेतला आहे. महापालिकेत विविध विभागांकडे त्या-त्या विषयातील तज्ज्ञ अधिकारी असताना पुन्हा सल्लागार नेमणुकीवर खर्च का करावा? असा प्रश्‍न साने यांनी उपस्थित केला. याबाबत साने यांनी विकासकामांसाठी बाह्य सल्लागार नेमलेल्या सल्लागारांची विस्तृत माहिती मिळण्याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे दत्ता साने यांनी पत्रव्यवहार केला आहे. त्याद्वारे आजपर्यंत बाह्य सल्लागारांनी केलेल्या कार्यामुळे किंवा दिलेल्या सल्ल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांचे जीवनमान सुधारण्यास काही हातभार लागला का? असेल तर कसा? आणि नसेल तर का नाही? असा प्रश्‍नही साने यांनी उपस्थित केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका सध्या सल्लागारमय झाली आहे. आता महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनाही सल्लागार नेमण्याची गरज आहे. मध्यंतरी पिंपळे गुरव येथे पेव्हिंग ब्लॉक बसवण्यासाठी सल्लागार नेमण्यात आला. चऱ्होलीत स्मशानभूमीच्या कामासाठी सल्लागार नेमला जातोय. या महापालिकेत कोणतेही काम सल्लागाराशिवाय होत नाही. मग, भरमसाठ पगार देवून अधिकाऱ्यांना का पोसायचे? असा प्रश्‍न आयुक्‍तांना का पडत नाही.
– दत्ता साने, विरोधी पक्षनेता, महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)