महापालिकेतील दोन “बाहुबली’

– गावडे, आष्टीकरांची कसरत : तब्बल 18-20 विभागांचा “बोजा’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनात एक अतिरिक्‍त आयुक्‍त आणि दोन सहायक आयुक्‍त पदाची भरती करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, अद्याप शासनाची अनुमती मिळाली नाही. परिणामी, महापालिकेतील प्रभारी अतिरिक्‍त आयुक्‍त प्रवीण आष्टीकर आणि अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे यांच्यावर प्रमुख विभागांसह 18 ते 20 विभागांचा “सुपरव्हायझरी चार्ज’ सोपवण्यात आला आहे. त्यामुळे सध्यस्थितीला महापालिकेतील हे दोन्ही अधिकारी म्हणजे प्रशासनातील “बाहुबली’ बनले आहेत, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या वतीने प्रभारी अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे आणि प्रवीण आष्टीकर यांच्याकडे “सुपरव्हायझरी चार्ज’ सोपवण्यात आला आहे. याशिवाय या दोन्ही अधिकाऱ्यांकडे सहायक आयुक्‍त म्हणूनही काही विभागांची जबाबदारी सोपवली आहे.

सध्यस्थितीला प्रवीण आष्टीकर यांच्याकडे प्रशासन, भांडार आणि निवडणूक अशा तीन विभागांचा कारभार सहायक आयुक्‍त म्हणून सोपला आहे. यांसह प्रभारी अतिरिक्‍त आयुक्‍त म्हणून अन्य 17 विभागांचा कारभार हा “सुपरव्हायझरी चार्ज’ पहावा लागत आहे. आयुक्‍तांच्या सूचनेनुसार या विभागांच्या कामकाजावर आष्टीकरांना नजर ठेवावी लागते. वास्तविक, आयुक्‍तांची भूमिका ही काम करुन घेण्याची असते. त्यामुळे अतिरिक्‍त आयुक्‍तांकडे “सुपरव्हायझरी चार्ज’ दिले जातात. आयुक्‍तांचे अधिकार हे “सुपरव्हायझरी चार्ज’ म्हणून अतिरिक्‍त आयुक्‍तांना विभागून दिले जातात.

दुसरीकडे, प्रभारी अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे यांच्याकडे स्वच्छ भारत अभियान, प्रॉपर्टी टॅक्‍स, अभिलेख, जनसंपर्क विभागाचा सहायक आयुक्‍त म्हणून कारभार पहावा लागतो. तसेच, आयुक्‍तांचे “सुपरव्हायझरी चार्ज’ म्हणून सुमारे 16 ते 17 विभागांचा कारभार सांभाळत आहेत. आयुक्‍तांच्या वतीने या विभागांच्या फाईल अतिरिक्‍त आयुक्‍त तपासणी करीत असतात. त्यानंतर पुन्हा त्याची स्क्रुटनी करुन त्या आयुक्‍तांकडे स्वाक्षरीसाठी पाठवल्या जातात.

परिणामी, या दोन्ही अधिकाऱ्यांच्या टेबलांवर मोठ्याप्रमाणात फाईल येत असतात. त्यांचा निपटारा करण्यासाठी दोघांची कसरत सुरू असते. महापालिका आयुक्‍त आणि संबंधित विभागातील दुवा म्हणून काम करावे लागते. त्याचा ताण दैनंदिन कामकाजावर होत असतो. यासह सहायक आयुक्‍त स्मीता झगडे आणि विजय खोराटे यांच्याकडेही तीन-तीन विभागांचा कारभार आहे.

सत्ताधारी भाजपची कृपादृष्टी
पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर आणि दिलीप गावडे यांच्यावर सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी कृपादृष्टी दाखवली आहे. त्यांना एकेक करीत तब्बल 18 ते 20 विभागांचा कारभाराचे नियंत्रण दिले आहे. याखेरीज, बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडील आर्थिक अधिकार काढून ते प्रवीण आष्टीकरांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. या सर्व विभागातील अंतिम निर्णय तेच घेणार आहेत. आयुक्‍तांचे अधिकार दोन्ही अतिरिक्‍त आयुक्‍तांकडे विभागून दिल्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीशिवाय कोणतीही फाईल आयुक्‍तांच्या समोर जात नाही, त्यामुळे महापालिकेतील हे दोन्ही अधिकारी सध्या सर्वाधिक ताकदवान झाले आहेत.

सध्या माझ्याकडे प्रशासन, भांडार आणि निवडणूक अशा तीन विभागांचा कारभार सहायक आयुक्‍त म्हणून आहे. तसेच, अतिरिक्‍त आयुक्‍त म्हणूनही जबाबदारी आहे. महापालिका आयुक्‍त आणि संबंधित विभागून दिलेल्या विभागांच्या सहायक आयुक्‍तांमधील दुवा म्हणून “सुपरव्हायझरी चार्ज’ अतिरिक्‍त आयुक्‍तांकडे असतो. योग्य नियोजनामुळे सध्या कामाचा तसा ताण नाही. पण, माझ्या टेबलावरील शंभर टक्‍के फाईल मी पूर्ण केल्या आहेत.
– प्रवीण आष्टीकर, प्रभारी अतिरिक्‍त आयुक्‍त, पिंपरी-चिंचवड महापालिका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)