महापालिकेच्या पर्यवेक्षकांची ससेहोलपट

– दोन पर्यवेक्षकांवर शिक्षण विभागाची मदार

पिंपरी – महापालिकेच्या शिक्षण विभागातील पर्यवेक्षकांची ससेहोलपट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील दोन महिन्यांपासून शिक्षण विभागात चार पर्यवेक्षक होते. परंतु, कामाचा अतिरिक्त भार बघून दोन पर्यवेक्षकांनी राजीनामे दिल्याने केवळ दोन पर्यवेक्षकांना शिक्षण विभागाची “अतिरिक्त’ कामे करावी लागणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 105 शाळा असून खासगी 527 शाळा आहेत. पर्यवेक्षकांना महापालिकेच्या शाळांवर नियंत्रण ठेवणे, विविध उपक्रम राबविणे, कार्यक्रमांचे नियोजन करणे, शाळांची पाहणी करणे, मुख्याध्यापक-शिक्षकांशी समन्वय राखणे आदी प्रकारची कामे करुन शाळांची गुणवत्ता वाढ व दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. परंतु, सद्यस्थितीत शिक्षण विभागातील पर्यवेक्षकांना इतर कामासाठी जुंपत असल्याने ते शाळांकडे लक्ष कधी देणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शिक्षण विभागातील कामाचा भार बघता या ठिकाणी सात ते आठ पर्यवेक्षकांची गरज असताना केवळ दोन-चार पर्यवेक्षक आहेत. मागील चार महिन्यांपूर्वी सहा पर्यवेक्षक होते. परंतु, कामाचा वाढता व्याप बघून पर्यवेक्षकांनी राजीनामे दिलेले आहेत. याचबरोबर, शिक्षण विभागात कोणतेही काम असल्यास पर्यवेक्षकांच्या कार्यालयाकडे बोट दाखविले जाते.

सध्या पर्यवेक्षकांच्या कार्यालयात फायलींचे ऑडीट करण्याचे काम सुरु असल्याने फायलींचा गठ्ठा टेबलावर पडून आहे. अशा वेळेस पर्यवेक्षकांना काम करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याची आवश्‍यकता आहे. महापालिकांच्या शाळा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतात. परंतु, शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते अशांना अतिरिक्त काम लावले जाते. यामुळे, शाळांची गुणवत्ता ढासळण्याची शक्‍यता असते.

अतिरिक्‍त भार पेलवेना
शिक्षण विभागाने पर्यवेक्षकांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसत आहे. पर्यवेक्षकांची अतिरिक्त कामासाठी नेमणूक केली असल्याचे दिसत आहे. तसेच, या विभागातील काही कर्मचारी केवळ फाईली हातात घेऊन दिवसभर महापालिकेत फिरताना आढळून येतात. परंतु, प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा भार सहन करावा लागत असल्याचे दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)