महापालिकेचे भोसरी रुग्णालय “जर्जर’

पिंपरी – भोसरी येथील महापालिकेचे रुग्णालय अनेक समस्यांच्या विळख्यात अडकलेले आहे. या रुग्णालयातील भिंतीना तडे गेले असून महिला वॉर्ड पावसाच्या पाण्याने गळत आहे. तसेच, फिजिशियन डॉक्‍टरच उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होताना दिसून आले आहे. भोसरी रुग्णालयाची इमारत बांधून तयार असून उद्‌घाटनाअभावी ती रखडली आहे.

महापालिकेच्या भोसरी रुग्णालयाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. या रुग्णालयामध्ये नेत्ररोग, दंतरोग, कान, नाक, घसा यावरती उपचार केले जातात. येथे बालरोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. मात्र, सद्यस्थितीमध्ये त्याची कमतरता जाणवत आहे. या ठिकाणीे प्रयोगशाळा, एक्‍स-रे विभाग उपलब्ध आहेत. मात्र, तज्ज्ञ डॉक्‍टर नसल्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. तसेच, सर्पदंश झालेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून वायसीएम रुग्णालयात पाठवले जात आहे. रुग्णांवर दुपारी चार वाजेपर्यत भरती करुन नंतर सोडून दिले जात आहे. तसेच, रुग्ण जास्त अत्यावश्‍यक असल्यास वायसीएम रुग्णालयामध्ये पाठवले जाते. भोसरी रुग्णालयात खाटांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, देखभाली अभावी रुग्णालयात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. नागरिकांना उपचार मिळण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्चून रुग्णालये बांधली जातात. मात्र, डॉक्‍टरांअभावी रुग्णांना उपचार मिळत नाहीत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भोसरी रुग्णालयाचा परिसर मोठा असल्याने उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. या रुग्णालयात सकाळ-सायंकाळी रुग्णांची गर्दी असते. रोज सुमारे 300 ते 350 रुग्ण दिघी, मोशी, चाकण, पिंपरी, भोसरी आदी परिसरातून येत असल्याचे आढळून आले. मात्र, सुविधांअभावी रुग्णांची गैरसोय होत आहे. तसेच, रुग्णालयाच्या इमारतीची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी भिंतीला तडे गेल्याने पावसाचे पाणी गळत असल्यामुळे रुग्णांसह कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने अस्वच्छता निर्माण झाली आहे. तिसऱ्या मजल्यावरील औषध विभागामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने दिसून आले. रुग्णालय परिसरातील सांडपाणी वाहिनी सतत तुंबल्याने मैलपाणी साचून दुर्गंधी पसरते. रुग्णालयातील स्वच्छतागृह वेळोवेळी साफ केली जात नाहीत. या समस्येमुळे सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची आवश्‍यकता आहे.

दरम्यान, वायसीएम रुग्णालयावरील ताण कमी करण्यासाठी तसेच भोसरी व परिसरातील रुग्णांच्या सोईसाठी भोसरी येथे नव्याने शंभर खाटांचे रुग्णालय महापालिकेच्या वतीने उभारण्यात आले आहे. मात्र, हे रुग्णालय उद्‌घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. सर्व्हे नंबर एकमध्ये एक एकर जागेवर जवळपास चार हजार चौरस मीटर जागेवर तीन मजली सर्व सोयींनीयुक्त असे हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. मनुष्यबळाचा अभाव आणि किरकोळ कामे प्रलंबित राहिल्याने रुग्णालयाची नवीन इमारत धुळखात पडून आहे. हे रुग्णालय लवकरात लवकर खुले करण्याची मागणी भोसरीकरांकडून होत आहे.

महापालिकेच्या संबंधित विभागाने रुग्णालयाच्या भिंतींची पाहणी केली आहे. तसेच, फिजिशियन डॉक्‍टर रुग्णालयाला उपलब्ध होण्याबाबत पत्र पाठविले आहे. रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध होईपर्यत येथे येणाऱ्या रुग्णांना प्राथमिक उपचार करुन वायसीएम रुग्णालयात पाठविले जात आहे.
– डॉ. श्रीकांत शिंदे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, भोसरी रुग्णालय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)