महाआघाडी झाली तरी, पुन्हा भाजपचेच सरकार

मुंबई – राज्यातील सत्तेवर पुन्हा येण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची धडपड सुरु आहे. आगामी निवडणूकीसाठी त्यांच्यात महाआघाडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण कॉंग्रेस आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या काळातील कामे आणि आमच्या साडेतीन-चार वर्षांतील विकासकामे यांच्याबाबत त्यांच्या नेत्यांनी माझ्याशी एकाच मंचावर चर्चा करावी, असे आव्हान देतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणूकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीने कितीही आघाड्या केल्या तरी देशात आणि राज्यात भाजपाचेच सरकार जिंकून येईल, असा दुर्दम्य विश्वास व्यक्त केला.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या चार वर्षांत सर्वसमावेशक विकास आणि खरे परिवर्तन काय असते, ते दाखवून दिले आहे. केंद्राच्या मदतीने महाराष्ट्रातही गेल्या साडेतीन-चार वर्षांत मोठया प्रमाणात विकासकामे झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आयुष्मान भारतमुळे देशातील 50 कोटी जनतेच्या आरोग्यविषयक समस्या सुटणार आहेत. प्रत्येकाला 5 लाख रूपयांपर्यंतचे संरक्षण मिळणार असल्याने ग्रामीण भागातही उच्चदर्जाच्या आरोग्यसुविधा उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्रात 70 वर्षांत केवळ 5 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान मोदी आणि केंद्रिय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यात 15 हजार किमीच्या राष्ट्रीय महामार्गांची भर घालण्यात आली.कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळात सिंचनक्षेत्रात भ्रष्टाचारच होता. तिजो-यांचे सिंचन होत होते मात्र जमिनीचे, शेतक-याचे सिंचन होत नव्हते. आम्ही सिंचनक्षेत्रातील कंत्राटदारी मोडीत काढली. गेल्या साडेतीन वर्षांत 13 लाख हेक्‍टरने सिंचनक्षमता वाढविली. शिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा 18 वा क्रमांक तिस-या क्रमांकावर आणला. शेतीवरचा खर्च दुप्पट केला.

शेतक-यांना कॉंग्रेस सरकारने 15 वर्षांत 7 हजार कोटी रूपये विम्यापोटी दिले. आमच्या 4 वर्षांत 11 हजार 900 कोटींची विम्याची रक्कम आम्ही दिली. देशातील सर्वात मोठी अशी ऐतिहासिक कर्जमाफी दिली. त्यातील 16 हजार कोटी रूपयांची रक्कम शेतक-यांच्या खात्यात जमा देखील झाली. कॉंग्रेसने 15 वर्षांत केवळ 450 कोटींच्या अन्नधान्याची खरेदी केली. आम्ही 4 वर्षांत 8 हजार 500 कोटींच्या अन्नधान्याची खरेदी केली असेही ते म्हणाले.

भाजपाचे 1 कोटी सदस्य आहेत. एकटया महाराष्ट्रात 2 कोटी जनतेपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ पोचला आहे. आपण काय केले हेच जर जनतेपर्यंत नेले तरी पुरेसे आहे. त्यासाठी आत्मविश्वासाने जनतेपर्यंत विरोधी पक्ष आज जनतेला विश्वास देउ शकत नाही म्हणून भ्रमित करू पाहत आहे. पण त्यांचे सर्व डाव हाणून पाडा. त्यासाठी जनतेशी,सर्वसामान्य मतदाराशी संवाद वाढवा असेही ते म्हणाले.

मराठा समाजासाठी सर्वाधिक योजना
मराठा,धनगर,ओबीसी सर्वच समाजासाठी या सरकारने काम केले.मराठा समाजासाठी आमच्या सरकारने जितक्‍या योजना आणल्या तितक्‍या आधीच्या कोणत्याच सरकारने आणल्या नाहीत. कॉंग्रेसच्या काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाला निधीच देण्यात आला नाही. तो जर मिळाला असता तर आज मराठा समाजातील तरूण हा नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा झाला असता.ओबीसी समाजासाठीही केंद्र आणि राज्य सरकारने मोठे काम केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)