महसूल शंका समाधान

एका आजीने 1.21 हेक्‍टर आर शेतजमिनीपैकी 0.81 आर जमीन 1995 साली तिच्या तीन वर्षाच्या नातवाच्या नावे नोंदणीकृत बक्षीसपत्राने दिली. परंतु सात-बारा सदरी त्या आजीचेच नाव कायम राहिले व जमीन त्या नातवाच्या वडिलांच्या ताब्यात राहिली. 19 वर्षानंतर सन 2014 मध्ये त्याच आजीबाईने तिचे संपूर्ण 1.21 हेक्‍टर आर क्षेत्र तिचा मुलगा (तिच्या नातवाचे वडील) याला नोंदणीकृत मृत्यूपत्रान्वये दिले. आजी मयत झाल्यानंतर, आज तलाठी यांना दोन्ही कागदपत्रे प्राप्त झाली. या प्रकरणात काय करावे?
समाधान : सदर प्रकरण आधी विवादग्रस्त नोंदवहीला नोंदवून यावर मंडलअधिकारी यांनी सुनावणी घ्यावी. बक्षीसपत्र नोंदणीकृत असल्याने तो कायदेशीर दस्त आहे. सन 1995 मध्ये बक्षीसपत्र करून दिल्यावर आजीचा त्या बक्षीसपत्रात नमुद क्षेत्रावरील (0.81 आर) मालकी हक्क संपुष्टात आला आहे. ते क्षेत्र तिच्या मालकीचे राहिले नाही. जे क्षेत्र तिच्या मालकीचे नाही त्याबाबत मृत्युपपत्र करण्याचा तिला कायदेशीर अधिकार नाही. या तरतुदीन्वये एकूण 1.21 हेक्‍टरर आर क्षेत्रापैकी 0.81 आर क्षेत्र नातवाच्यार नावे तर उर्वरित क्षेत्र तिचा मुलगा (तिच्या नातवाचे वडील) यांच्या नावे नोंदवावे.

दानपत्र/बक्षीसपत्र/विना मोबदला बहिणीचे हक्‍कसोडपत्र, रुपये शंभरच्या स्टॅंप पेपरवर नोटरीकडे नोंदविलेले आहे. त्याची नोंद फेरफार सदरी करता येईल काय?
समाधान : नाही. नोंदणी अधिनियम 1908, कलम 17 अन्ववये, रुपये शंभरपेक्षा जास्ते किंमतीच्या मिळकतीचे हस्तांतर दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत केलेले असणे बंधनकारक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एका खातेदाराने त्याच्या मोठ्या मुलाला त्याच्या मालकीच्या शेतजमिनीचे खरेदीखत करून दिले आहे व त्या नंतर त्याच जमीनीचे खरेदीखत लहान मुलाच्या नावे करून दिले आहे. कोणते खरेदीखत नोंदीसाठी ग्राह्ये धरावे आणि कोणते रद्द करावे?
समाधान : ज्यावेळी खातेदाराने मोठ्या मुलाच्या नावे पहिले खरेदी खत करून दिले तेव्हाच त्याचा त्या जमिनीवरील मालकीहक्‍क संपुष्टात आला. मालकी हक्‍क नसतांना त्याने केलेले दुसरे खरेदी खत अवैध व बेकायदेशीर आहे. महसूल अधिकारी हे महसूल वसुलीची जबाबदारी ठरविण्यासाठी अभिलेखात नोंद करणारे अधिकारी आहेत. कोणतेही नोंदणीकृत खरेदीखत रद्द करण्याचा अधिकार महसूल अधिकाऱ्यांना नाही. त्यासाठी संबंधिताने दिवाणी न्यायालयात दाद मागावी.

शेत जमीन अधिकार अभिलेखातील कडई पत्रक म्हणणजे काय?
समाधान : सन 1910 च्या आसपास जमीन मोजणी संदर्भात बंदोबस्त योजना राबविण्यात येऊन त्याप्रमाणे जमिनीचे बंदोबस्त नकाशे तयार करण्यात आले. बंदोबस्त नकाशाचे प्रमाण 16 इंच म्हणजे 1 मैल असे होते. काही ठिकाणी आजही बंदोबस्त नकाशाच्या आधारे मोजणी केली जाते. बंदोबस्त नकाशातील शेताच्या दर्शक क्रमांकास सर्व्हे नंबर म्हणतात. बंदोबस्त नकाशाच्या आधारे वऱ्हाड भागात सर्व्हे नंबर नुसार कब्जेदारांच्या कब्जातील क्षेत्रानुसार हक्‍काचे अधिकार अभिलेख तयार करणेत आले. या हक्‍काच्या अधिकार अभिलेखाला विदर्भ (नागपूर परिसरात) आणि मराठवाडयात ‘खसरा पत्रक’ तर पश्‍चिम महाराष्ट्रात कडई पत्रक म्हणून ओळखले जाते.

एका खातेदाराच्या नावे असणारी 73 गुंठे जमीन सन 2012 पासून ‘पड’ आहे. अशी अनेक वर्षे ‘पड’ असलेली जमीन शासन जप्त करू शकते काय? खातेदाराला आता त्या जमिनीवर पिके घ्यायची आहेत. त्याला कोणाची परवानगी घ्यावी लागेल?
समाधान : महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम 65 अन्वाये सलग दोन वर्षे लागवडीखाली न आणलेल्यास जमिनीचे व्यावस्थापन शासन स्वत:कडे घेऊ शकेल अशी तरतुद आहे. तथापि, असे झाले नसल्याने आणि त्याल जमिनीवर खातेदाराची मालकी अद्याप असल्याने, त्या जमिनीवर पिके घेण्यासाठी कोणाच्याही परवानगीची आवश्‍यवकता नाही. खातेदाराने नवीन हंगामात हवे ते पीक घ्यावे. तलाठी ज्यावेळेस पीक-पाहणीसाठी येतील तेव्हा सदर पिकाची नोंद गाव दप्तरात घेण्याची विनंती त्यांना करावी.

1 COMMENT

  1. वारसाहक्काने मिळालेले पाच एकर जमिनीमध्ये पाच भावंडांनी आपापल्या क्षेत्रापैकी काही क्षेत्रे कुठल्याही प्रकारचे वाटप झाले नसताना विक्री केले त्यादरम्यान एकच क्षेत्र दोन वेगळ्या व्यक्तींना विकण्यात आले तर खरेदी ग्राह्य धरले जातील का त्यामुळे खरेदीदारास शेत्र काढून देण्यास अडचण येत आहे काय करावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)