महसूल शंका समाधान

‘पोटखराब’ क्षेत्र म्हणजे काय आणि त्याचे किती प्रकार आहेत?
‘पोटखराब’ क्षेत्र खडकाळ, खंदक, खाणी, नाले, इत्यादीने व्याप्त असलेले क्षेत्र ज्यात पीक लागवड करता येणे शक्‍य होत नाही असे लागवडीयोग्य नसलेले क्षेत्र.

या ‘पोटखराब’ क्षेत्राचे ‘पोटखराब’ वर्ग अ’ आणि ‘पोटखराब’ वर्ग ब’ असे दोन प्रकार आहेत.
‘पोटखराब-वर्ग अ’ म्हणजे खडकाळ क्षेत्र, नाले, खंदक, खाणी इत्यादीने व्याप्त असलेले क्षेत्र.

वर्ग अ अंतर्गत येणाऱ्या पोटखराब क्षेत्रावर महसुलाची आकारणी करण्यात येत नाही. जरी अशी जमीन शेतकऱ्याने कोणत्याही लागवडीखाली आणली, तरीही अशी जमीन आकारणीस पात्र असणार नाही. ‘पोटखराब-वर्ग अ’ प्रकाराखाली येणाऱ्या क्षेत्राची आकारणी करायची असेल तेव्हा त्याबाबतचा प्रस्ताव तहसीलदारांमार्फत मा. जमाबंदी आयुक्त यांना सादर करून आदेश प्राप्त करावा लागतो. अशा आदेशानंतरच ‘पोटखराब-वर्ग अ’ प्रकाराखाली येणाऱ्या क्षेत्रावर आकारणी करता येते. तथापि, ‘पोटखराब-वर्ग अ’ क्षेत्राखाली येणाऱ्या जमिनीत जर शेतकऱ्याने काही पीके घेतली असतील तर पीक पाहणीच्या वेळेस अशा पीकांची नोंद घेता येते.

‘पोटखराब वर्ग ब’ म्हणजे रस्ते, पदपथ किंवा जलप्रवाह, कालवे, तलाव अशा सार्वजनिक प्रयोजनार्थ किंवा घरगुती प्रयोजनासाठी वापरणेत येणारे तलाव किंवा ओढा यांनी व्यापलेली किंवा कोणत्याही जाती-जमातीमार्फत दहनभूमी किंवा दफनभूमी म्हणून वापरात असणारी; किंवा पाण्याची टाकी, रहिवास वापर अशा काही विशिष्ठ प्रयोजनार्थ राखून ठेवलेली, आणि त्यामुळे लागवडीसाठी उपलब्ध नसलेले क्षेत्र. ‘पोटखराब वर्ग ब’ क्षेत्रावर कोणत्याही प्रकारची महसूल आकारणी करण्यात येत नाही.

‘पोटखराब ‘वर्ग अ’ आणि ‘वर्ग ब’ याची क्षेत्र पडताळणी जिल्हा भूमापन कार्यालयातील माहितीशी तसेच उपलब्ध अभिलेखातील लागवडीयोग्य नसलेल्या (गाव नमुना एकचा गोषवारा) क्षेत्राशी करावी. पोटखराब ‘वर्ग अ’ आणि ‘वर्ग ब’ चे क्षेत्र स्वतंत्रपणे लिहून त्याखाली एकूण पोटखराब क्षेत्र लिहीले जाते.

कोणकोणत्या शेतजमिनींना जमीन महसुलात सूट दिलेली असते?
ज्या गावाची पैसेवारी पन्नास पैश्‍यापेक्षा कमी असते तेथील जिरायत शेत जमिनींवरील शेतसारा माफ असतो. परंतु उपकर अदा करावे लागतात.

महसूल व वन विभाग, अधिसूचना क्र. आरईव्ही 1077-16447-ल-2 दिनांक- 29/12/1977 आणि आरईव्ही 1078-33338-ल-2 दिनांक- 08/05/1979 अन्वये खालील खातेदारांना जमीन महसुलात सूट देण्योत आली आहे.

1. ज्या खातेदारांचे संपूर्ण राज्यातील एकूण जिरायत (कोरडवाहू) जमीन धारण क्षेत्र 3 हेक्‍टरपेक्षा जास्त नाही आणि त्यांच्या कोणत्याही जमिनीचा, कोणताही भाग, कोणत्याही प्रकारे, सिंचनाखाली येत नाही, अशा खातेदारांना जमीन महसूल आकारणी वसुलीतून सूट दिलेली आहे परंतु त्यांना जि.प. तसेच ग्रा. प. हे स्थानिक उपकर माफ नाहीत.

2. ज्या खातेदारांच्या संपूर्ण राज्यातील एकूण शेत जमीन धारणेवर वार्षिक जमीन महसुलाची आकारणी रुपये 5/- पर्यंत आहे अशा खातेदारांना जमीन महसूल तसेच जि.प. आणि ग्रा. प. या स्थानिक उपकरांच्या वसुलीतून सूट दिलेली आहे.

3. ज्या खातेदारांच्या संपूर्ण राज्यातील एकूण शेत जमीन धारणेवर वार्षिक जमीन महसुलाची आकारणी रुपये 5/- ते रुपये 10/- दरम्यान आहे तसेच त्यांच्या कोणत्याही जमिनीचा, कोणताही भाग, कोणत्याही प्रकारे, सिंचनाखाली येत नाही, अशा खातेदारांना जमीन महसूल आकारणी वसुलीतून सूट दिलेली आहे परंतु जि.प. तसेच ग्रा. प. हे स्थानिक उपकर माफ नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.