महसूलच्या 31 अधिकाऱ्यांची बदली होणार

फेब्रुवारीत आदेशाची शक्‍यता ः बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांना दुष्काळ व लोकसभेचे रणांगण

नगर – आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिने प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या अनुषंगाने निवडणुकीशी संबंध येणाऱ्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या 15 फेब्रुवारीपूर्वी करण्याचे शासनाने निश्‍चित केले आहे. नगर जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी आणि प्रातांधिकारी दर्जाचे सुमारे 11 अधिकारी, तर तहसीलदार पदावरील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या निश्‍चित मानल्या जात आहेत.

गत पंचवार्षिकला म्हणजेच, 2014 च्या निवडणुकांच्या वेळी अधिकाऱ्यांच्या बदल्या ऐन निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या तोंडावर झाल्या होत्या. त्यामुळे अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी रुजू होऊन तेथील आपले कार्यक्षेत्र समजावून घेण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यावेळी 15 फेब्रुवारीपूर्वी बदल्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्याला नव्या ठिकाणी तयारीसाठी किमान तीन आठवडे मिळणार आहे. ते पाहता जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात बदल्यांचे आदेश जारी होतील, असा अंदाज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महसूल खात्यासाठी एका पदावर तीन वर्षे व एका जिल्ह्यात चार पेक्षा अधिक वर्ष सेवा हा बदल्यांचा प्रमुख निकष आहेत. राज्यात दुष्काळी स्थिती आहे. त्याच्या उपाययोजनांचा बहुतांश अभ्यास निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना असतो. त्यामुळे बदलीला पात्र नसेल तर (एका पदावर तीन वर्ष) त्यांनाही या निवडणूक बदल्यांमधून वगळले जाणार आहे. दरम्यान, बदल्याच्या शक्‍यतेमुळे अनेक अधिकाऱ्यांनी तयारी केली आहे. “काळजीवाहू सरकार’पद्धतीने काही सरकारी अधिकाऱ्यांचे काम सुरू आहे. त्यामुळे महसूलच्या कामात काहीशी उत्साह दिसत नाही.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महापालिकेच्या आयुक्त पदाचा प्रभारी पदभार आहे. त्याचाही परिणाम महसूलच्या कामावर दिसू लागला आहे. जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत आहे. फेब्रुवारीत दुष्काळाची दाहकता अधिक वाढणार आहे. जुने अनुभवी अधिकारी यांची बदली होणार आहे. त्यामुळे नव्याने बदलून येणाऱ्या अधिकाऱ्यांना या दुष्काळाला समोरे जावे लागणार आहे. त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीची तयारी देखील एक दिव्य असणार आहे. परिणामी सर्वाधिक कामाची भिस्त ही जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्यावर असणार आहे.

राजकीय वाटेवरील अधिकाऱ्यांची पंचाईत

निवडणूक बदल्यांमध्ये पात्र ठरणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या सोईच्या ठिकाणी नियुक्ती मिळविण्यासाठी राजकीय मार्गाने मोर्चेबांधणी चालविली होती. त्यासाठी आमदारांची पत्रेही घेतली गेली. राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांनी राजकीय शिफारसीवरून बदल्या करणार नाही, असे शपथपत्र दिले आहे. त्यामुळे राजकीय वाटेवरील अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. त्यातच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्‍विनी कुमार यांचे या बदल्यांवर बारकाईने लक्ष आहे. 4 मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

11 उपजिल्हाधिकारी व 20 तहसीलदारांच्या बदलीची शक्‍यता

एकट्या महसूल खात्याचा विचार केल्यास प्रत्येक महसूल विभागातून किमान 12 ते 15 उपजिल्हाधिकारी व 25 ते 30 तहसीलदारांच्या बदल्या होण्याची शक्‍यता आहे. अतिरीक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचीत, जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, उपजिल्हाधिकारी संदीप आहेर (भूसंपादन), उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी रवींद्र ठाकरे (शिर्डी), उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोटे (संगमनेर), उपविभागीय अधिकारी गोविंद दाणेज (श्रीगोंदे-पारनेर), उपजिल्हाधिकारी वामन कदम (रोजगार हमी योजना) व उपजिल्हाधिकारी नीलेश जाधव (भूसंपादन), तहसीलदार मुकेश कांबळे (अकोले), साहेबराव सोनवणे (संगमनेर), किशोर कदम (कोपरगाव), माणिक आहेर (शिर्डी), सुभाष दळवी (श्रीरामपूर), अनिल दौंडे (राहुरी), सुधीर पाटील (नेवासे), विनोद भांबरे (शेवगाव), किरण सावंत (कर्जत), गणेश मरकड (पारनेर), आप्पासाहेब शिंदे (नगर), जितेंद्र इंगळे, मनीषा राशीनकर, राजेश थोटे, सदाशिव शेलार व हेमलता बडे (जिल्हाधिकारी कार्यालय) यांची बदलीची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)