मल्टीबॅगरच्या शोधात…

मल्टीबॅगर.. हा शब्द ऐकून भल्याभल्यांचे कान टवकारले जातात. मल्टी बॅगर म्हणजे नक्की काय ? अगदी साध्या भाषेत सांगायचे तर मल्टीबॅगर म्हणजे एखादा कमी किंमतीचा शेअर दुप्पट पाचपट अथवा अनेकपट होणं. म्हणजेच त्यात गुंतवलेले पैसे अनेक पटींनी वाढणं. आता याचा अर्थ कोणी लॉटरी असा लावत असेल तर ते एका दृष्टीनं योग्यच आहे परंतु मग शेअर म्हणजे लॉटरी आणि लॉटरी म्हणजे जुगार असं म्हणून ती व्यक्ती शेअरबाजाराकडं पाठ फिरवणार असेल तर ती एका चांगल्या गुंतवणुकीला मुकते आहे, एवढे नक्की. याचा अर्थ असा नाही की शेअरबाजारातील प्रत्येक शेअर मल्टीबॅगर असू शकतो किंवा प्रत्येक शेअर बाजारात कमवून देतोच. खरा मल्टीबॅगर शोधण्यासाठी अभ्यास हवाच.

जर आपण मागील काही वर्षांचा आढावा घेतल्यास, मागील पाच वर्षांमध्ये 30 ते 40 पट झालेले काही शेअर्स आढळून येतील. हीच खरी जादू आहे मल्टीबॅगर्सची. विप्रोसारख्या लॉंग-टर्म मल्टीबॅगर्सविषयी आपण बोलत नाही,ज्यात 1980 मध्ये केलेल्या 10 हजार रुपये गुंतवणुकीचे 450 कोटी रुपये झालेत!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उदाहरणच द्यायचं झाल्यास आयशर मोटर्सचं देता येईल. एप्रिल 2009 मध्ये 185 रुपये असणारा शेअर आज तब्बल 30200 रुपयांच्यावरती व्यवहार करत आहे. दुसरं उदाहरण सिम्फनीचं देता येईल, ऑक्‍टोबर 2013 मध्ये 150 रुपये असणारा शेअर जानेवारी 2018 मध्ये 2200 रुपये जाऊन आलाय. अगदी ताजं उदाहरण म्हणजे बिर्लामनी.फेब्रु. 2016 मध्ये 20 रुपयांत असलेला हा शेअर पुढील दीड वर्षांमध्ये 160 रुपयांच्यावर जाऊन आलाय. (मागील एका लेखात असाच HEG बाबत उल्लेख केला होता) तर असे हे मल्टीबॅगर्स शोधायचे कसे?
खालील काही गोष्टी तपासल्यास नक्कीच अशा प्रकारचे मल्टीबॅगर्स शोधावयास मदत होईल.

1. कंपनीची वृद्धीची क्षमता आणि सलग वाढ – म्हणजे कंपनी ही वृद्धीकेंद्रित हवी व प्रत्येक तिमाहीत ती वाढ दिसून यावी. उदा. किंगफिशर आणि इंडिगो. किंगफिशर कंपनीची काही कारणानं वाढ न होता ती दिवाळखोर ठरली, याउलट इंडिगो ही कंपनी वाढत राहिली.

2. खासियत – कंपनीची काहीतरी खासियत असली पाहिजे. उदा. आयशर ही कंपनी मागील काही वर्षांत आपल्या एन्फिल्ड बुलेट या एकाच ब्रॅंडमुळं लोकप्रिय झाली.

3. समभाग – मोठ्या प्रमाणात आलेला आयपीओकंपनीसाठी कधी कधी डोकंदुखी ठरू शकतो. उदा. टाटा टेलीसर्व्हिसेस. तीव्र स्पर्धा असलेल्या टेलिकॉम क्षेत्रात मोठी इक्विटी असणं ही कंपनीसाठी समस्या ठरली.

4. कर्ज – नेहमीच कमी कर्ज अथवा शून्य कर्ज (Debt Free) असलेली कंपनी निवडणं हे फायद्याचंच. किंवा काढलेल्या कर्जाचा उपयोग कंपनीच्या मूळ व्यवसायात होतो आहे का हे बघणं फार महत्वाचं.

5. पारदर्शकता – इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ति म्हणतात, ‘When in doubt disclose’. कंपनीत एखादी छोटीशी गडबड झाल्यास गुंतवणूकदारांपासून ती लपवू नका. म्हणून व्यपस्थानात जरी गडबड झाली तरी, ऑगस्ट 2017 मध्ये 860 रुपयांवर आलेला इन्फोसिसचा शेअर आज पुन्हा वार्षिक उच्चांक गाठतोय. याउलट किंगफिशर एअरलाईन्स किंवा सत्यम कॉम्प्युटर्स.

6. दिखाऊपणा – चांगल्या कंपन्या कधीच अवाजवी खर्च करीत नाहीत किंवा दिखाव्यासाठी खर्च करत नाहीत, खरंतर त्यांना तसं करायची गरजच पडत नाही. याउलट असं आढळून आलंय की ज्या कंपन्यांचे व्यवसाय शंकास्पद असतात त्या कंपन्याच दिखाव्यावर जास्त भर देतात. उदा. किंगफिशर एअरलाईन.

7. उलथापालथ – कंपनीकडं स्वतःचं असं एक वेगळं पण उत्तम उत्पादन हवं की जे इतर कंपन्यांच्या चालू असलेल्या उत्पादनांना हादरा देऊ शकेल. उदा. रिलायन्स जियो.

8. मक्तेदारी – कंपनीची त्या क्षेत्रात मक्तेदारी असणं. उदा. पीडिलाइट, गोवा कार्बन, रेन इंडस्ट्रीज.
निफ्टी 50 चा मागोवा :

मागील लेखात उल्लेखल्याप्रमाणं निफ्टी 50 नं आपलं 10930 हे उद्दिष्ट गाठून अधोगामी दिशा पकडली होती व मागील आठवड्यात 10420 च्या आसपास आधार घेऊन पुन्हा शुक्रवारी 10600 पर्यंत उसळी मारली. त्यामुळं या आठवड्यात 10410-10420 ही निफ्टी50 साठी चांगली आधार पातळी असेल तर 10740 च्या आसपास वरील बाजूस अडथळा असेल.

कच्च्या तेलाच्या किंमती, पेट्रोल व डिझेल वरील करात कपात करण्याबद्दलच्या हालचाली, अमेरिकी डॉलरचा रुपयातील भाव, जूनमध्ये असणारी रिझर्व बॅंकेची पतधोरण बैठक इत्यादी गोष्टी येणाऱ्या महिन्यात एकत्रितरित्या बाजारावर परिणाम करणाऱ्या ठरतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)