मलकापुरात कोयनेच्या पेढ्याची गोड चर्चा

सुधीर पाटील
कराड, दि. 27 – कराड दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष, मलकापूरचे उपनगराध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक असलेल्या मनोहर शिंदे यांच्या गटाने मलकापूर नगरपंचायतीला क वर्ग नगरपालिकेचा दर्जा मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करताना चक्क उंडाळकरांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या कोयना संघाचे पेढे वाटले. यामुळे मलकापूरच्या राजकारणात कोयनेच्या पेढ्याची गोड चर्चा सुरू आहे.
मलकापूर ग्रामपंचायतीची नगरपंचायत आणि नगरपंचायतीची आता नगरपालिका झाली. या तिन्ही घटना मनोहर शिंदे यांच्या कार्यकाळात झाल्या. शिंदे हे पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक आणि कॉंग्रेस विचारांचे पुरस्कर्ते आहेत. कराड दक्षिणेत सलग 35 वर्षे लोकनेते विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे राजकीय वर्चस्व राहिले. या दरम्यान, उंडाळकर-चव्हाण यांच्यात पक्षांतर्गत वैर जोरात होते. आता या दोन्ही गटांमध्ये समेटाचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. दोन्ही गटांतील काही नेते कार्यक्रमांमध्ये एकत्र येताना दिसत आहेत. मनोहर शिंदे आणि उंडाळकर पूत्र ऍड. उदयसिंह पाटील यांचीही सार्वत्रिक कार्यक्रमांमध्ये जवळीक वाढली आहे. म्हणूनच मलकापूरच्या येत्या निवडणुकीत नवी राजकीय समीकरणे उदयास येणार असल्याची चर्चा मलकापूरात आहे.
उंडाळकर आणि चव्हाण यांच्या समर्थकांमधील जवळीकीला आणि दोन्ही गट एकत्रित येणार असल्याच्या चर्चेला पुष्टी देणाऱ्या घटना अलिकडे मलकापूरात घडल्या आहेत आणि घडत आहेत. मलकापूर नगरपंचायतीला क वर्ग पालिकेचा दर्जा मिळण्यासाठी सत्ताधारी समर्थकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयीन पातळीवर आवश्‍यक तो पाठपुरावा करत आपली बाजू सक्षम केली. परिणामी क वर्ग पालिकेचा दर्जा मिळण्याचे संकेत दि. 27 जुलै रोजीच मिळाले होते. त्यावेळी मनोहर शिंदे समर्थकांनी मलकापूरात मोटरसायकल रॅली काढून जल्लोष केला. नागरिकांना कोयनेचे पेढे वाटले. त्यानंतर दि. 24 सप्टेंबरला अंतिम अधिसूचना प्रसिध्द झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी (मंगळवारी) शिंदे समर्थकांनी कोयनेचेच पेढे वाटले. यावरून मलकपुरातील चव्हाण-उंडाळकर गटातील राजकीय कटुता कोयनेच्या पेढ्यासारखी गोडीत बदलत चालल्याची चर्चा आहे.
कोयना दूध संघ हा विलासकाका उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि उंडाळकर गटातील यापूर्वीचे राजकीय सख्य पाहता चव्हाण गटाने कोयनेच्या पेढ्याची गोडी चाखली नसावी. मात्र, आता चव्हाण गटाला कोयनेचे पेढे गोड वाटू लागले आहेत. यावरून मलकापूरच्या राजकारणात चव्हाण-उंडाळकर गटातील कटू वातावरण आता गोडीत बदलत चालल्याचे चित्र आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)