मराठा महासंघाचे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार

डॉ. आप्पासाहेब आहेर : जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वाई, दि. 30 (प्रतिनिधी) – देशातील व राज्यातील भाजप सरकारने व मराठा समाजाच्या आमदार, खासदार व सर्वच पक्षांच्या सरकारने आजपर्यंत फक्त मतांचे राजकारण करीत मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. आरक्षणासंदर्भात मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मुकमोर्चे काढण्यात आले. तरीही सरकारने मराठा समाजाची दखल घेतली नाही. मराठा समाजाचे खासदार, आमदार समाजाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येण्यास तयार नाही. त्यामुळे मतांचे राजकारण करणाऱ्यांना कायमचे घरी बसविण्याचा विडा भारतीय मराठा महासंघाने उचलला असून मराठा समाजाला खऱ्या अर्थाने आरक्षण मिळण्यासाठी या संघाचा प्रतिनिधी विधानसभेत जाणे आवश्‍यक आहे. प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी भारतीय मराठा महासंघाचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणार असून यापुढे वाई तालुक्‍यात खासदार, आमदार हे मराठा महासंघाच्या विचारांचाच असेल अशी ग्वाही भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब आहेर यांनी केली.संघाच्यावतीने वाई येथे आयोजित केलेल्या जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या निवडी व मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष बंसिदादा डोके, महिला प्रदेशाध्यक्ष ऍड. वंदनाताई जाधव, संपर्क प्रमुख सागर कदम, सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ, पुणे जिल्हाध्यक्ष पै. राजन आमराळे, जिल्हा संघटक सागर पवार, जिल्हाध्यक्ष नियोजन समिती मकसूद शेख, जिल्हाध्यक्ष चित्रपट आघाडी सचिन ससाणे, जिल्हाध्यक्ष प्रचार-प्रसार अभय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मांढरे, वाई तालुकाध्यक्ष विकास यादव, खंडाळा तालुकाध्यक्ष सागर कदम, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष जगन्नाथ भिलारे, जिल्हा महिला सचिव सौ. स्वाती शेडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आप्पासाहेब आहेर म्हणाले, मराठा समाजात शेतकरी वर्गाचा जास्त प्रमाणात समावेश असल्याने सध्या शेतीच्या मालाला हमी भाव सरकार देत नाही. शेतातून निघालेला माल बांधावर टाकण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांच्या पोरांना शिकूनसुध्दा नोकऱ्या नाहीत. शेती पिकत नाही, आरक्षण नसल्याने सरकारी योजनांचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळे कर्जबाजारी झालेला शेतकरी आत्महत्येसारखे पर्याय निवडत आहेत. तरीही प्रस्थापित शासनाला व मराठी समाजाच्या खासदार, आमदारांना दया येत नसेल तर भारतीय मराठा संघाचा उमेदवार विधानसभेत पाठविल्याशिवाय राहणार नाही. सध्या या समाजाला कोणत्याही पक्षाचे पाठबळ नसल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळवून घेण्यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञाच डॉ. आहेर यांनी केली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बंसिदादा डोके यांनी मार्गदर्शन केले तर ऍड. उमेश सणस यांनी छ. शिवाजी महराजांची कार्यपद्धती व मराठा आरक्षण यावर सखोल मार्गदर्शन केले. जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघ यांनी आपल्या प्रास्ताविकात भारतीय मराठा संघाची पुढील ध्येय धोरणे संक्षिप्त स्वरूपात मांडण्यात आली.
यावेळी समाजातील विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी यांचे विशेष कार्य करणाऱ्या महाबळेश्वरमधील सह्याद्री ट्रेकर्स, यशोधन चॅरीटेबल ट्रस्टचे रवी बोडके, समाजसेवक व उद्योजक तुकारामशेठ जेधे, रयत सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव कोंढाळकर, वीर जीव महालेच्या तेराव्या वंशज व यशवंतनगर ग्रामपंचायतीत बिनविरोध निवडून आलेल्या सौ. मेघा सचिन सावंत यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात छ. शिवाजी महराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून करण्यात आली. तसेच सातारा जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र देवून विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. मेळाव्यात जिल्ह्यातून व विविध तालुक्‍यातून आलेल्या सर्व समाजातील बांधवांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)