मराठा, धनगर, वंजारी, महादेव कोळी व मुस्लिम आरक्षणाचा एकच प्रस्ताव संसदेत पाठवा

उद्धव ठाकरे : मागास आयोगाची वाट न पाहता आरक्षण द्या 
मुंबई – मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन तातडीने बोलावून आरक्षण देण्यात यावे. त्यासाठी मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट बघण्याची काही गरज नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच मराठा समाजासोबतच धनगर, वंजारी, महादेव कोळी यांच्यासह मुस्लिम समाजाच्याही आरक्षणाच्या मागणीचा एकच प्रस्ताव संमत करून संसदेत पाठविण्यात यावा, अशी मागणी करीत या मुद्यावर विधिमंडळात व संसदेत सरकारला पूर्ण समर्थन देऊ असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाला तातडीने आरक्षण लागू करावे या मागणीसाठी मराठी क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी राज्यभरात आंदोलन केली जात आहेत. एवढेच नव्हे तर मराठा समाजातील काही तरूणांनी आत्महत्या करून टोकाचे पाऊल उचलले आहे. या आरक्षणाच्या मुद्यावरून शिवसेनेची भूमिका ठरविण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांनी “मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व मंत्री, आमदारांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीत अनेकांनी आपली मते मांडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मराठा समाजासोबतच धनगर, वंजारी, जंगम, महादेव कोळी, मुस्लिम जे समाज आज त्यांच्या न्याय हक्‍कासाठी मागणी करत आहे. या सर्वांच्या मागण्यांचा विचार करून एकच प्रस्ताव तयार करण्यात यावा. एकमताने तो संमत करून संसदेत मंजुरीसाठी पाठविण्यात यावा. मात्र हे करताना ज्यांना आधी आरक्षण आहे त्यांच्या आरक्षणाला धक्‍का न लावता त्यांना जे आधी दिले गेले आहे, त्यातले काही कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. मराठा समाजाचीही तीच भूमिका असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आर्थिक निकषावर आरक्षणाचा पुरस्कार करायचे. याबाबत विचारले असता, प्रत्येक जातीला पोट असते पण पोटाला जात नसते, असे बाळासाहेब म्हणाले होते. आमचेही तेच म्हणणे आहे. निकष कोणतेही लावा पण गरिबांची पोटे भरा. नोकरी आणि शिक्षणासाठी त्यांच्या न्याय हक्‍कासाठी कोणतेही निकष लावा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

आत्महत्या हा उपाय नाही!
आरक्षणावरून मराठी माणसात जातीपातीच्या भिंती उभ्या राहू नयेत. मराठी माणसांमध्ये यामुळे भांडणे व्हायला नकोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा समाजातील तरूणांनी देखील आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा यावरचा उपाय नाही. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी अशी टोकाची पावले उचलू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)