मराठा क्रांती मोर्चाने शाहूनगरी दणाणली

पाच हजार आंदोलकांचा सहभाग:बंदला 100 टक्के प्रतिसाद

मोर्चेकऱ्यांच्या संख्येने
पोलिसांची तारांबळ

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दैनंदिन व्यवहार अन्‌
दळणवळण ठप्प

मोर्चेमार्गावरील चौकाचौकात
पोलीस बंदोबस्त
सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) –
“एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा देत मराठा आंदोलक भगव्या ध्वजांसह येथील राजवाड्यापासून रस्त्यावर उतरले. राजवाडा, पोवई नाका ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान निघालेल्या भव्य मोर्चात पाच हजार आंदोलक सहभागी झाले होते. मराठा आंदोलकांनी आरक्षणाचा ठाम निर्धार या वेळी व्यक्त केला. मोर्चात जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या मराठा बांधवांमुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर जनसागर उसळला होता. शांत आणि संयमितपणे काढलेल्या मोर्चेकऱ्यांची संख्या पाहून बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांची तारांबळ उडाली. यावेळी पंचकन्यांच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले. प्रचंड मोठ्या प्रमाणात निघालेला मोर्चा आणि जय्यत पोलीस बंदोबस्त यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
मराठा आरक्षण या प्रमुख मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने राज्यभर मूक मोर्चे काढण्यात आले. पण, या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने ठोस निर्णय न घेता समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे पेटून उठलेल्या मराठा समाजाने पुन्हा मोर्चाचे दुसरे सत्र सुरू केले. बुधवारी साताऱ्यात मराठा समाजाने शाहूनगरीत शांत व संयमी मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.दोन दिवसांपूर्वीच उत्स्फूर्तपणे बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी बंदला संपूर्ण जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
सातारा शहरासह जिल्ह्यात व्यावसायिकांनी सकाळपासूनच दुकाने उघडली नाहीत. संपूर्ण सातारा शहरात व्यापार उदीम दैनंदिन व्यवहार आणि दळणवळण वाहतूक व्यवस्था ठप्प होती. जिल्हा प्रशासनाने पहिल्या पर्वाचा अनुभव लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेतली. त्यासाठी मोर्चामार्गावरील चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. आंदोलकांसाठी पोलिसांनी पोवई नाका शाहू चौक राजवाडा येथ ेबॅरिगेट्‌स लावण्यात आल्या होत्या.
राजवाडा येथून सुरू झालेल्या मोर्चात लाखोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले आहेत. एक मराठा लाख मराठा, जय शिवाजी जय भवानी, आरक्षण आमच्या हाकाचे नाही कोणाच्या बापाचे, तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण द्या नाहीतर खुर्ची खाली करा, आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. मोर्चाची सुरवात सकाळी साडेदहा वाजता राजवाडा येथील गांधी मैदानावर झाली. आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे त्यापाठोपाठ मोर्चात सामील झाले. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा आणि राजवाड्यावरून बाईक रॅली झाल्यानंतर मोर्चा मोती चौक देवी चौक तालीम संघ मैदान शाहू चौक मार्ग पोवई नाक्‍यावरून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. कार्यकर्त्यानी स्वयंशिस्त पाळल्याने त्यांना ग्रेडसेपरेटरची सुद्धा अडचण जाणवली नाही.
शिवतीर्थावर आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर हा मोर्चा जिहाधिकारी कार्यालयावर आला. जिल्ह्यातून बरेच आंदोलक याठिकाणी सकाळी लवकर दाखल झाले होते. या ठिकाणी आंदोलकांचा अक्षरशः जनसागर उसळला. यावेळी मराठा समाजातील बांधवानी तीव्र भावना व्यक्त केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाला चारही बाजूने पोलीसांचा गराडा होता. संकेताप्रमाणे पाच मराठा कन्यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देत मराठा समाजाला तत्काळ आरक्षण द्यावे. अन्यथा आमच्या सहनशक्तीचा उद्रेक होईल. यापुढे घडणाऱ्या घटनांची जवाबदारी राज्य शासनाची असेल या शब्दात या कन्यकांचा त्रागा व्यक्त झाला.

चौकट
सरकारने फेकलेल्या तुकड्यावर
जगू नका: आ. शिवेंद्रसिंहराजे

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठा समाजाने आत्तापर्यंत शाततेच्या मार्गांनी राज्यभर आंदोलने केली. तरी या भाजप सरकारला मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय जाहिर केला नाही सरकारच्या भुमिकेमुळे आज मराठा समाज राज्यभर रस्त्यावर आक्रमकपणे उतरलेला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही हे सरकारने लक्षात घ्यावे. मराठा आंदोलनाला वेगळे स्वरूप येण्याआधी परिस्थीत लक्षात घेवून मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा असा इशारा आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बोलताना दिला. दरम्यान मराठ्यानो सरकारने फेकलेल्या तुकड्यांवर किती जगायच.आता हीच वेळ आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय आता मागे हटू नका असे आवाहनही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी मराठा जनसमुदायाला उद्देशून केले.

आमदारांना जमावाने रोखले
आमदार शशिकांत शिंदे यांनी मोर्चात सहभागी होत मराठा बांधवांना आरक्षणासाठी आरपारची लढाई लढण्याचे आवाहन केले . तर मराठा आंदोलनाला वेगळ स्वरूप येण्याआधीच त्वरित निर्णय घ्या असे थेट आवाहन आमदार शिवेंद्रराजे यांनी राज्य शासनाला केले . मात्र काही वेळाने आंदोलक जमावाने गोंधळ करायला सुरवात करत दोन्ही आमदारांना चक्क रोखले. याची आंदोलन स्थळी चर्चा होती.

शांततेचे आवाहन
आज सकाळ पासून साताऱ्यात धुमसलेले मराठा आरक्षण आंदोलन दुपारनंतर निवळले, जाळपोळ, तोडफोड, दगडफेक हवेत गोळीबार यामुळे साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात धुमश्‍चक्री उडाली होती. या धुमश्‍चक्रीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, हिंसक झालेल्या जमावावर लाठी चार्ज केला तसेच हवेत गोळीबार करण्यापर्यंत परिस्थिती चिघळली होती. पोलिसांनी यावेळी हिंसक झालेल्या आंदोलकांची धरपकड केली. त्यामुळे दुपारनंतर वातावरण पूर्वपदावर येत परिस्थती निवळली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी जिल्हावासियांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)