मराठा क्रांती मोर्चाची गुरुवारी भोर बंदची हाक

भोर – सकल मराठ्यांना सरकारने आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरू करण्यात आला असून, मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने 58 मोर्चे काढले. मात्र सत्ताधारी सरकारने याची दखल न घेता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याच्या नावाखाली दुर्लक्ष केले. सोमवारी (दि.23) कायगांव (औरंगाबाद) येथे झालेल्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले असून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा भोर यांनी गुरुवारी (दि. 26) चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला असून, भोर बंदची हाक दिली आहे.
सकाळी साडेनऊ वाजता शेटेवाडी चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या आंदोलनास सुरुवात होणार असून, चौपाटी ते एसटी बसस्थानकादरम्यान चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे. या चक्काजाम आंदोलनाचे नेतृत्व मराठा समाजाच्या महिला करणार आहेत. यावेळी सकाळी 11 वाजता भोरच्या तहसीलदार आणि उपविभागिय अधिकारी यांना मराठा आरक्षणाच्या संदर्भात लेखी निवेदन दिले जाणार असून भोर शहर, तालुका, मराठा बांधव, सर्व संघटनांच्या कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)