मराठा क्रांती मोर्चाचा आज पुण्यात एल्गार

“मागण्या मंजूर करा, अन्यथा नेत्यांना फिरू देणार नाही’
– ठोस निर्णयासाठी शासनाला दोन दिवसांचा “अल्टिमेटम’

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 28 – “मराठा समाजाच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात, आंदोलकांवर सरकारने दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत या तसेच अन्य मागण्यांसाठी रविवारी सकल मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हातर्फे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांमध्ये शासनाने ठोस भूमिका स्पष्ट केली नाही, तर दि. 9 ऑगस्ट रोजी राज्यभर गनिमी काव्याच्या स्वरुपात आंदोलन करण्यात येईल,’ असा इशाराही यावेळी देण्यात आला.
डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून निषेध मोर्चाला सुरूवात होणार आहे. हा मोर्चा विविध मार्गांवरून शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे. तेथे आंदोलनामध्ये बलिदान दिलेल्या तरूणांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याचे समन्वयक विकास पासलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. शांताराम कुंजीर, बाळासाहेब आमराळे, तुषार काकडे, रघुनाथचित्रे पाटील, मीना जाधव यावेळी उपस्थित होते.
पासलकर म्हणाले, “सरकारने मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे मराठा समाजामध्ये उद्रेक निर्माण झाला असून, त्यामुळे मूक मोर्चाचे ठोक मोर्चामध्ये रुपांतर झाले आहे. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची शासन धरपकड करत असून, त्यांच्यावर 302, 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल करत आहे. त्यामुळे आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत. मराठा समाजाच्या भावनांशी न खेळता आरक्षणाची मागणी तत्काळ मंजूर करावी, अन्यथा 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या वेळी मराठा समाज ऐकाही नेत्याला फिरू देणार नाही.’
अमराळे म्हणाले, “सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला असता, तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. दि. 9 ऑगस्ट 2016 मध्ये शांतता व शिस्तीचे पालन करुन लाखो मराठा बांधवांचा मोर्चा निघाला होता. या घटनेला दोन वर्ष पूर्ण होतील. त्यामुळे शासनाने दोन दिवसांत समाजाच्या मांगण्यांविषयी ठोस निर्णय घेतला नाही, तर 9 ऑगस्टला गनिमी कावा करून आंदोलन करण्यात येईल.’

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन
शहरात रविवारी काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सुद्धा कडक बंदोबस्त ठेवला आहे. शिवाय वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. हा मोर्चा सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा डेक्‍कन येथून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवाजीनगरपर्यंत काढण्यात येणार आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्ता, शिवाजी रस्त्यावरील वाहतूक आवश्‍यकतेनुसार वळविण्यात येणार आहे. मोर्चा मार्ग व त्या परिसरातील रस्ते व त्यांना जोडणारे इतर लहान रस्ते यावरील वाहतूक संथ होणार आहे, असेही वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी मोर्चाच्या वेळेपुरता पर्यायी मार्गांचा वापर करुन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)