मराठा आरक्षण बंदला खटाव तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद ki

वडूज : येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

वडूज, दि. 25 (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या बंदला वडूजसह खटाव तालुक्‍याच्या ग्रामीण भागातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
वडूज येथील हुतात्मा स्मारकात सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शहरातील मराठा समाजातील युवक व नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले. प्रथमत: हुतात्मा परशुराम घार्गे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा काढण्यात आला. भगवे ध्वज, डोक्‍यावर क्रांती मोर्चाची टोपी असा वेष धारण केलेल्या युवकांनी आरक्षण आमच्या हक्काचे … मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे.. मराठा क्रांती मोर्चाचा विजय असो.. अशा घोषणा देत शहरातून मोर्चा काढला. बाजार पेठ, शेतकरी चौक, बाजार चौक, छत्रपती संभाजी चौक, शहा पेट्रोल पंप मार्गे हा मोर्चा छत्रपती शिवाजी चौकात आला. त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी सुमारे दीड तास रास्ता रोको करून ठिय्या आंदोलन केले. यावेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांनी मनोगते व्यक्त केली. मनोगतामध्ये आरक्षण देण्यास राज्य शासनाकडून टाळाटाळ होत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासनाच्या विरोधात तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार सुशिल बेल्लेकर यांनी निवेदन स्विकारले.
दरम्यान निमसोड, म्हासुर्णे, गुरसाळे, सिद्धेश्‍वर कुरोली, होळीचागाव, भुरकवडी, औंध आदी ठिकाणीही व्यापारी व ग्रामस्थांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

आता यापुढे गनिमी कावा….
मराठा समाजाच्या सहनशिलतेचा राज्यकर्ते अंत पाहत आहेत. मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर करो या मरो ची हाक दिली आहे. शासनाच्या चालढकलीच्या धोरणाबद्दलही मराठा समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आजचा मोर्चा हा सनदशिर मार्गाने होता त्यामुळे शासनाने आमच्या भावनांचा अंत पाहू नये आता पुढील आंदोलन हे गनिमी कावा पद्धतीनेच केले जाणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)