मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन “ओपन डोअर’च झाले पाहिजे: खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर: मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या तरूणांवरील गुन्हे मागे घेतले नाही, तर संभाजी छत्रपती म्हणून मला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. तसेच मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन “क्‍लोज डोअर’ नव्हे तर “ओपन डोअर’च झाले पाहिजे, अस त्यांनी ठणकून सांगितले. सकल मराठा समाजातर्फे दसरा चौकात सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास त्यांनी आज भेट दिली. त्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी आरक्षणासंबंधी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
संभाजीराजे म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्र पिंजून काढला. राजर्षी छत्रपती शाहू राजांनी 1902ला बहुजन समाजाला आरक्षण देऊनही मराठा समाजाची हलाखीची स्थिती समजून आली. मराठा समाजाचे नेतृत्त्व नव्हे, तर जनजागृती करायला पाहिजे, हे लक्षात आले. मराठा आरक्षणासाठी पहिला महामोर्चा मुंबईत काढल्यानंतर 2017ला 58 शिस्तबद्ध मराठा क्रांती महामोर्चे झाले. ज्याची दखल जगाने घेतली. 2017ला मुंबईतील महामोर्चावेळी माझ्यासमवेत असलेल्या मराठा समाजातील घटकांनी मला स्टेजवर जाण्याचा आग्रह धरला. मराठा समाजाचे नेतृत्त्व मी करत नाही, असे त्यांना सांगितले. मात्र, तणावपूर्ण स्थितीचा अंदाज घेत त्यांनी मला स्टेजवर जायला सांगितले. अखेर मी स्टेजवर गेलो आणि मराठा समाजाचा मेसेज द्यायला आल्याचे सांगितले. त्या दिवशीच यापुढे क्‍लोज डोअर मिटिंगला जायचे नाही, हे ठरवून टाकले.
पार्लमेंटसमोर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अर्धा तास फलक घेऊन उभा होतो. तेथे एकही नेता माझ्यासमवेत आला नाही, ही खंत आहे. राज्यसभेत मी आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र आल्याखेरीज आरक्षण मिळणार नाही, ही भूमिका घेतली. त्यामुळे सर्व पक्षातील लोक एकत्र येत आहे. अनेक संघटनांनी मी व सातारचे उदयनराजे भोसले यांनी समन्वयाने नेतृत्त्व करावे, अशी मागणी केली आहे. आम्ही सुद्धा तलवारी उचलू शकतो. पण, आम्हाला अन्य समाजाला त्रास द्यायचा नाही, असेही ते म्हणाले.
मी मोठा नाही. बहुजन समाज मोठा आहे. माझे दोन-तीन विरोधक आहेत. त्यांना मी स्वत: फोन केला होता. आझाद मैदानावर मला तोंडघशी पाडल्याचे त्यांनी मला सांगितले. त्यांचा सल्ला चांगला असून, यापुढे मी कधीच पुढे जाणार नाही, अशी भूमिका संभाजीराजे यांनी मांडली. तसेच चर्चेला मराठा समाजाचा एक घटक म्हणून मी हजर असेन. समाजाचे नेतृत्त्व म्हणून नव्हे. मराठा समाजासाठी जरूर समन्वय घडवून आणेन. पण, चर्चेत मराठा समाजातील प्रमुख घटकच सहभाग घेतील, असेही ते म्हणाले.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)