मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरूणची आत्महत्या

फेसबुक पोस्ट लिहून रेल्वेसमोर उडी
औरंगाबाद – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मुकुंदवाडी इथे राहणाऱ्या प्रमोद होरे-पाटील या 31 वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी बंदची हाक दिली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण शांतता होती.

विशेष म्हणजे प्रमोदने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर मराठा आरक्षण मिळावे, यासाठी आत्महत्या करत असल्याची पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट प्रमोद होरेने रविवारी (29 जुलै) दुपारी टाकली होती. फेसबुक पोस्ट पाहून त्याच्या मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने फोन उचलला नाही. मित्रांनी आणि कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, पण त्याचा तपास लागला नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“चला आज एक मराठा जातोय, पण काही तरी करा, मराठा आरक्षणासाठी करा, जय जिजाऊ…’ आपला प्रमोद पाटील’ असे त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. तर दुसरी पोस्ट 4.50 वाजता पोस्ट करत त्यात मराठा आरक्षण जीव जाणार असे नमूद केले होते. दुसरी पोस्ट टाकतेवेळी रेल्वे रुळावर सेल्फी काढला होता. अखेर मध्यरात्री मुकुंदवाडी भागात धावत्या रेल्वेखाली उडी घेत त्याने आत्महत्या केली, असे पोलीस तपासात समोर आले आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रमोद होरे स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. सतत येणाऱ्या अपयशाने तो दुखी होता. विज्ञान शाखेत पदवीधर असलेल्या प्रमोद विवाहित होता. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. शिवाय त्याला एक मोठा भाऊ असून तो गतिमंद असल्याने सर्व कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो खचला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन तो आंदोलनात सक्रीय होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे आणि मित्राचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)