मराठा आरक्षणासाठी आंदोलक रस्त्यावर…

काही ठिकाणी हिंसक वळण


दुपारनंतर मुंबईतील बंद मागे


आणखी एका आंदोलकाचा मृत्यू


नवी मुंबईत पोलिसांचा हवेत गोळीबार


दगडफेक आणि वाहने पेटविण्याचे प्रकार

मुंबई – मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला राज्यभरात ठिकठिकाणी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी सायन-पनवेल हायवेवर कळंबोलीजवळ पोलिसांच्या दोन गाड्या पेटवल्या. तर साताऱ्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली.

दरम्यान, आंदोलनादरम्यान मंगळवारी विषप्राशन करणाऱ्या जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे यांचा बुधवारी मृत्यू झाला.औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला असून या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने काल 24 जुलैला “महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. त्यानंतर आज म्हणजे 25 जुलैला मुंबई बंदची हाक देण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी मुंबईच्या कळंबोली येथे बंद दरम्यान आंदोलकांनी पोलिसांवरच दगडफेक केल्याने या दगडफेकीत पोलीस अधिक्षक जखमी झाला. आंदोलकांनी दगडफेक करतानाच पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ केल्याने जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या संपूर्ण आंदोलनामुळे मुंबई-पुणे महामार्ग दोन्ही बाजूने बंद होता.

त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. तसेच आंदोलन भडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 समाजकटंकांना अटक केल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी दिली. याशिवाय आणखी काही संशयीतांची ओळख पटली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. आंदोलन पेटवल्याचा प्रयत्न केल्याबद्दल या सर्वांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यातील गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरावर आणि कार्यालयावर आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी लक्ष्मण पवार घराबाहेर आले. आंदोलकांसोबत चर्चा सुरु असतानाच काही जणांनी अचानक लक्ष्मण पवार यांच्या घरावर दगडफेक केली. त्यामुळे प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

मानखुर्दजवळ आंदोलकांनी बेस्टच्या बसची तोडफोड करत बस पेटवली. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होत बसची आग विझवली. तर नाशिकरोड परिसरात आंदोलकांनी अनेक दुकानांसह एटीएमची तोडफोड केली.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी पुकारलेला मुंबई बंद दुपारी स्थगित करण्यात आला. मराठा क्रांती सकल मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दादरमध्ये पत्रकार परिषद घेऊन बंद स्थगित केल्याची घोषणा केली. तसेच ठाणे आणि नवी मुंबई बंदही स्थगित करण्याचे आणि शांततेचे आवाहन समन्वयकांनी आंदोलकांना केले.

आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला आहे. जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ई-मेलद्वारे राजीनामा पाठवल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. आरक्षणाची मागणी करत मराठा समाज राज्यभर आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देत हर्षवर्धन जाधव यांनी सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास आपण राजीनामा देणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)